19.2 C
Latur
Sunday, January 23, 2022
Homeदेगलूर पोटनिवडणूक उमेदवारात नव्हे तर दोन मातब्बर नेत्यात होणार!

देगलूर पोटनिवडणूक उमेदवारात नव्हे तर दोन मातब्बर नेत्यात होणार!

एकमत ऑनलाईन

नांदेड : देगलूर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीची रणधुमाळी घटस्थापनेच्या पहिल्या दिवसापासून सुरु होणार आहे. कॉंग्रेसचे रावसाहेब अंतापूरकर यांच्या अकाली निधनामुळे ही पोटनिवडणूक होत आहे. केवळ अडिच वर्षाचा कालावधी निवडून आलेल्या उमेदवाराला विकासात्मक कामे करण्यासाठी मिळणार असले तरी या निवडणुकीत ख-या अर्थाने दोन्ही राष्ट्रीय पक्षाच्या उमेदवारापेक्षा जिल्ह्यातील दोन मातब्बर नेत्यांमध्ये लढत होणार असल्याचे संकेत प्राप्त होत आहेत. त्यानुषंगाने दोन्ही राष्ट्रीय पक्षाचे नेते कामाला लागले आहेत. ‘अभी नही तो कभी नही’ अशी परिस्थिती निर्माण झाल्यामुळे दोन्ही नेत्यांच्या कुस्तीत कोण विजयी होणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

देगलूर विधानसभा पोटनिवडणुकीत कॉंग्रेसकडून जितेश अंतापूरकर यांना उमेदवारी जाहिर झाली आहे तर भारतीय जनता पार्टीकडून सुभाष साबणे यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे. वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार अद्यापही निश्चीत झाला नसला तरी डॉ. उत्तम इंगोले यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. वंचित बहुजन आघाडी पोटनिवडणुकीच्या रिंगणात उतरली असली तरी खरी लढत दोन राष्ट्रीय पक्ष भाजप आणि कॉंग्रेस यांच्यात होणार आहे. कॉंग्रेसचा उमेदवार हा महाआघाडीचा उमेदवार म्हणून घोषित झाला असला तरी अध्यापही सेना-राष्ट्रवादीच्या नेत्यांनी याबाबत कुठलेही वक्तव्य केलेले नाही. केवळ आमचा पाठिंबा आहे असे संकेत दिले आहेत. परंतु या निवडणुकीत कॉंग्रेस- भाजप यांच्यातच लढत असल्याचे पहावयास मिळत आहे.

कॉंग्रेसकडून नांदेड जिल्ह्याचे कॉंग्रेसचे सर्व्हेसर्वाह माजी मुख्यमंत्री तथा पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांनी या निवडणुकीची दखल घेतली असुन देगलूर पोटनिवडणुकीच्या छोट्या छोट्या हालचालींवर त्यांची नजर आहे. सामान्य कार्यकर्त्याच्या पाठिवर हात टाकून जवळीक साधत माहिती घेण्याचा प्रयत्न करत आहेत. नांदेड शहरातील महापालिकेतील सर्व कॉंग्रेस नगरसेवकांना जबाबदारी देण्यात आली आहे. अनेक नगरसेवक देगलूर-बिलोलीत मुक्काम ठोकून आहेत. आ. अमरनाथ राजूरकरांकडे मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. त्यामुळे पहिल्या दिवसापासून ते कामाला लागले आहेत.

दुसरीकडे भारतीय जनता पार्टीचे खा.प्रताप पाटील चिखलीकर यांच्यावर देगलूर विधानसभा पोटनिवडणुकीची जबाबदारी देण्यात आली आहे. या निवडणुकीवर दस्तूरखुद माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची देखील नजर आहे. खा. चिखलीकरांवर जबाबदारी दिल्यामुळे जुन्या नव्यांचा वाद संपवत साबणे यांना कुठल्याही परिस्थितीत विजय प्राप्त करुन देण्यासाठी त्यांनी चंग बांधला आहे. वेगवेगळ्या पध्दतीने शह, कटशह करत देगलूर विधानसभा मतदारसंघात भाजपचा उमेदवार कसा निवडून येईल यासाठी रणनिती आखत आहेत. जिल्ह्यातील सर्व भाजप कार्यकर्त्यांना एकत्रीत आणून त्यांच्यावर जबाबदारी सोपवणार असल्याचे सांगितल्या जात आहे. स्वत: देगलूर येथे तळठोकून प्रत्येक घडामोडीवर लक्ष केंद्रीत करणार असल्याचे बोलल्या जात आहे. नाराजांना जवळ करुन निवडणुकीची जबाबदारी देणार आहेत. एकंदरीत ही निवडणूक जिल्ह्यातील दोन मातब्बर नेत्यात होणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. त्यामुळे उमेदवारापेक्षा खा. चिखलीकर- ना. चव्हाण यांच्यात खरी लढत असल्याचे सांगितल्या जात आहे.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,567FansLike
192FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या