नवी दिल्ली : नवी दिल्लीत २६ जानेवारी होणा-या शेतक-यांच्या ट्रॅक्टर परेडला रॅलीला दिल्ली पोलिसांनी सुरक्षेच्या कारणास्तव परवानगी नाकारली आहे. दिल्ली पोलिसांचे सहआयुकक्त मनिष अग्रवाल यांनी ही माहिती दिली आहे. मात्र दुसरीकडे परवानगी नाकारल्यानंतरही प्रमुख शेतकरी नेते राजेश टिकैत यांच्यासह अन्य नेत्यांनी ठरलेल्या ठिकाणी ही परेड कोेणत्याही परिस्थितीत काढणारच असा इरादा बोलून दाखवला आहे.
प्रजासत्ताक दिनी शेतक-यांच्या नियोजित ट्रॅक्टर परेडच्या परवानगीबाबत गुरुवारी शेतकरी संघटना व दिल्ली पोलिसांमध्ये चर्चा झाली. चर्चेत दिल्ली पोलिसांनी दिल्लीच्या सीमेवरील रिंगरोडवर होणारी ट्रॅक्टर परेड ही प्रजासत्ताक दिन सोहळयाचे महत्त्व पाहता संकटाला निमंत्रण देणारी ठरु शकते, त्यामुळे तिला परवानगी देत नसल्याचे शेतक-यांना सांगितले. प्रजासत्ताक दिनाशिवाय इतर कोणत्याही दिवशी ही परेड नियोजित असती तर कोणतीही भीती नव्हती ,असे शेतकरी नेत्यांना सांगितले. मात्र शेतकरी संघटनांनी शुक्रवारी पुन्हा केंद्रसरकार व दिल्ली पोलिसांशी चर्चा करुन परवानगी मिळवू असे सांगितले आहे.
केंद्र सरकारने केलेल्या कृषि कायद्यांविरोधात गेल्या २ महिन्यांपासून पंजाब व हरियाणातील शेतकरी दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करीत आहेत. आंदोलकांच्या मागण्यांवर तोडगा काढण्यासाठी सरकार तसेच सर्वोच्च न्यायालयाकडूनही करण्यात आलेले सर्वच प्रयत्न फोल ठरले आहेत. दरम्यान सरकारवर दबाव वाढवण्यासाठी शेतकरी संघटनांनी दिल्लीत प्रजासत्ताक दिनी ट्रॅक्टर परेड काढण्याची घोषणा केली होती. त्यावरुनही आरोप -प्रत्यारोप सुरु झाले होते.
सर्वोच्च न्यायालयाकडून निर्णय नाही
ट्रॅक्टर परेडला परवानगी देऊ नये यामागणीसाठी केंद्रसरकारकडून सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र अशाप्रकारच्या परेड किंवा आंदोलनाला परवानगी देणे किंवा नाकारणे ही पोलिसांची बाब असल्याचे सांगत सर्वोच्च न्यायालयाने हात वर केले होते. त्यामुळे आता या ट्रॅक्टर परेडचे भवितव्य काय असणार अशी विचारणा करण्यात येत होती. दुसरीकडे ट्रॅक्टर परेडच्या आडून प्रजासत्ताक दिन सोहळयाला काही गालबोट लागल्यास जगभरात देशाची प्रतिष्ठा मलीन होण्याची भीतीही काहीजणांकडून व्यक्त केली जात होती. मात्र दिल्ली पोलिसांनी गुरुवारी शेतक-यांबरोबर झालेल्या चर्चेत ट्रॅक्टर परेडला परवानगी नाकारल्याने आता या परेडचे काय होते,असे प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
एकनाथ खडसेंना तात्पुरता दिलासा; सोमवारपर्यंत अटक नाही