नवी दिल्ली : वाराणसीच्या ज्ञानवापी मशिदीच्या सर्वेक्षणानंतर श्रीकृष्ण जन्मभूमीचा मुद्दा जोर धरू लागला आहे. अलाहाबाद उच्च न्यायालयात फिर्यादी मनीष यादव यांनी श्रीकृष्ण जन्मभूमी मंदिरालगत असलेल्या ईदगाह मशिदीचे सर्वेक्षण करण्याची मागणी न्यायालयीन आयुक्तांमार्फत केली आहे. मथुरा न्यायालयाने ही याचिका स्वीकारली असून आता या प्रकरणावर १ जुलै रोजी सुनावणी होणार आहे.
याचिकाकर्ते मनीष यादव, महेंद्र प्रताप स्ािंग आणि दिनेश शर्मा यांनी स्वतंत्रपणे अशीच याचिका दाखल करून कोर्ट कमिशनरची नियुक्ती करून इदगाह मशिदीचे व्हिडिओग्राफी करण्याची मागणी केली होती. न्यायालयाने ही याचिका स्वीकारली असून सर्व याचिकाकर्त्यांना तीच तारीख म्हणजे १ जुलै दिली आहे.
याचिकाकर्ते मनीष यादव यांचे वकील देवकीनंदन शर्मा म्हणतात, इदगाहमधील शिलालेख इतर पक्ष काढून टाकू शकतात आणि पुरावे नष्ट करू शकतात. दोन्ही पक्षांच्या उपस्थितीत छायाचित्रण केले जावे आणि सर्व तथ्य नोंदवले जावे. याप्रकरणी पुढील सुनावणी १ जुलै रोजी होणार आहे. या प्रकरणातील आणखी एक फिर्यादी महेंद्र सिंह म्हणतात, श्री कृष्ण जन्मस्थान आणि इदगाह मशीद प्रकरणात त्यांनी सर्वप्रथम २४ फेब्रुवारी २०२१ रोजी व्हिडिओग्राफी, जन्मस्थान कायद्यासाठी आयुक्त नेमण्याची मागणी करणारा अर्ज दिला होता. त्यावर कोणताही निर्णय न झाल्याने पुन्हा एकदा ९ मे २०२२ रोजी अर्ज देण्यात आला.
दुसरीकडे, शाही इदगाह मशिदीचे वकील तन्वीर अहमद म्हणतात, याचिकाकर्ते गेल्या २ वर्षांपासून वेगवेगळ्या प्रकारचे अर्ज देत आहेत, त्यांना काय म्हणायचे आहे हे त्यांनाच कळत नाही. दोन्ही समाजाची श्रद्धास्थाने वेगळी आहेत. मथुरेत व्हिडिओग्राफीची गरज नाही. इदगाह मशिदीसंदर्भात मथुरा कोर्टात आतापर्यंत १० खटले दाखल करण्यात आले आहेत.
चार महिन्यांत सर्व अर्ज निकाली काढा
याआधी गुरुवारी अलाहाबाद उच्च न्यायालयाने श्रीकृष्ण जन्मभूमी आणि इदगाह मशीद प्रकरणी महत्त्वपूर्ण निर्देश दिले होते. सर्व अर्ज जास्तीत जास्त ४ महिन्यांत निकाली काढण्यात यावेत, असे निर्देश उच्च न्यायालयाने मथुरा न्यायालयाला दिले आहेत. यासोबतच सुन्नी वक्फ बोर्ड आणि इतर पक्षकारांनाही सुनावणीला हजर न राहिल्यास एकतर्फी आदेश जारी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
वादामागील पार्श्वभूमी
लखनौ येथील रहिवासी रंजना अग्निहोत्री यांनी श्रीकृष्ण जन्मभूमीच्या १३.३७ एकर जमिनीच्या मालकीची मागणी करणारा दावा दाखल केला आहे. यामध्ये श्रीकृष्ण जन्मभूमीत बांधलेली शाही ईदगाह मशीद हटवण्याची मागणीही करण्यात आली आहे. कोर्टात दाखल केलेल्या दाव्यात भगवान कृष्णाच्या जन्मस्थानाजवळील कटरा केशव देव मंदिराच्या १३.३७ एकर परिसरात मुघल सम्राट औरंगजेबच्या आदेशानुसार १६६९-७०मध्ये बांधलेली मशीद हटवण्याची मागणी करण्यात आली आहे.