कोल्हापूर : बालकांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सर्व वयोगटातील रुग्णांसाठी दंतचिकित्सकांची सेवा आवश्यक आहे. दंतचिकित्सक क्षेत्रातील विविध पदे भरण्याची कार्यवाही सुरू आहे. ग्रामीण रुग्णालयांपर्यंत पदे निर्माण करण्याचे काम सुरू आहे, त्यामुळे ग्रामीण रुग्णालयातही दातांवर उपचार मिळतील, अशी माहिती सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी बुधवार, दि. १८ मे रोजी येथे दिली.
दंतचिकित्सक क्षेत्राला उर्जितावस्था येण्यासाठी व धोरण आखण्यासाठी दंत परिषदेने अभ्यासगटाद्वारे शिफारसी
शासनास सादर कराव्यात. धोरणात्मक बदल झाल्यास या क्षेत्रास उर्जितावस्था प्राप्त होईल, असे वैद्यकीय शिक्षणमंत्री
अमित देशमुख यांनी सांगितले. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे महाराष्ट्र राज्य दंत परिषदेने
कोविड दंत योद्धा पुरस्कार सोहळ्याचे आयोजन केले होते. या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी मंत्री राजेश टोपे होते तर पुरस्काराचे वितरण मंत्री अमित देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. मंत्री टोपे म्हणाले, दंतचिकित्सकांचे क्षेत्र मर्यादित असतानाही त्यांनी कोरोना काळात कोविड रुग्णांना सेवा दिली. ही अतिशय स्तुत्य बाब आहे. आर्थो डेंटल आणि कॉस्मेटिक डेंटल या नवीन शाखा उदयास येत असून, दंत क्षेत्रात आणखी संशोधन होणे गरजेचे आहे. लवकरच मोठी भरती या क्षेत्रात शासनामार्फत केली जाणार आहे. शहरातच नाही तर ग्रामीण भागापर्यंत ही सेवा मिळावी यासाठी चेअर उपलब्ध करून दिले जाणार आणि पदभरती केली जाणार आहे. महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत दंत वैद्यांना सामावून घेण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. इंडियन डेंटल असोसिएशन आणि कॉन्सिलने आपल्या माध्यमातून सेवा वाढवाव्यात. ‘डेंटल लॅब असिस्टंट’ या नवीन पदासाठी प्रमाणपत्र किंवा पदवी अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी कार्यक्रम तयार करावा, त्यासाठी शासन सर्वतोपरी सहकार्य करेल, असेही मंत्री टोपे यांनी सांगितले.
कोविड साथरोगाच्या काळात कोविड रुग्णांना उत्तम वैद्यकीय सेवा देणा-या महाराष्ट्रातील २०० दंतरोगतज्ज्ञांचा आज आरोग्यमंत्री राजेश टोपे व वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. हा कार्यक्रम महाराष्ट्र राज्य दंत परिषदेच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाराष्ट्र राज्य दंत परिषदेचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र काळे यांनी केले. त्यावेळी दंत तज्ज्ञांच्या विविध प्रश्नांवरही चर्चा झाली. हे सर्व प्रश्न सोडवण्याचे दोन्ही मंत्रिमहोदयांनी आश्वासन दिले.
त्यावेळी व्यासपीठावर इंडियन डेंटल असोसिएशनचे राष्ट्रीय सचिव डॉ. अशोक ढोबळे, भारतीय दंत परिषदेचे सदस्य डॉ. राहुल हेगडे व डॉ. अरुण दोड्ढमनी, वैद्यकीय शिक्षण सहसंचालक डॉ. विवेक पाखमोडे, महाराष्ट्र राज्य दंत परिषदेचे कार्यकारिणी सदस्य डॉ. राजेश गायकवाड, डॉ. राजेंद्रकुमार भस्मे, डॉ. राजेंद्र बिरंगणे, डॉ. सुशील मुंदडा, डॉ. समीर पाटील, प्रबंधक शिल्पा परब यासह मान्यवर उपस्थित होते.