मुंबई : विरोधी पक्षनेते आणि राज्यातील भाजप नेते देवेंद्र फडणवीस पुन्हा दिल्लीला गेले आहेत. बंडखोर एकनाथ शिंदे देखील दिल्लीला जाण्याची शक्यता आहे, केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट घेऊन स्ट्रॅटेजी ठरवणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. राज्यातील घडामोडींना वेग आला आहे.
पुढील ४८ तासांत बंडखोर शिंदे हे मुंबईत येण्याची शक्यता आहे. राज्यपालांना शिंदे गटाकडून किंवा छोट्या पक्षांकडून महाविकास आघाडी सरकारचा पाठिंबा काढल्याचे पत्र देणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. आता नेमकं काय घडणार, याकडे अवघ्या महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
तर चहूकडे हीच चर्चा आहे. बंडखोर एकनाथ शिंदे महाराष्ट्रात येणार असल्याने वातावरण तापण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तर दुसरीकडे आज देवेंद्र फडणवीस पुन्हा दिल्लीला गेल्याने सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आल्याची सूत्रांची माहिती आहे.
अमित शहा-फडणवीस-शिंदेंमध्ये चर्चा?
लवकरच राज्यात नवे सत्तासमीकरण पहायला मिळू शकते. भाजपचे नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या भेटीसाठी तातडीने दिल्लीला गेल्याची माहिती आहे. तर दुसरीकडे बंडखोर एकनाथ शिंदे देखील दिल्लीला जाणार असल्याची माहिती आहे. देवेंद्र फडणवीस आणि अमित शहा यांच्यात सत्तास्थापना, मंत्रिमंडळाचा नवा फॉर्म्युला यावर चर्चा होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.