मुंबई,दि.१५ (प्रतिनिधी) सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचे आरोप करणाऱ्या रेणू शर्मा यांनी आपल्यालाही ब्लॅकमेल केल्याचे सांगत तीन तक्रारदार पुढे आल्याने या संपूर्ण प्रकरणाला कलाटणी मिळाली आहे. त्यामुळे धनंजय मुंडे यांच्याविरुद्धची तक्रार गंभीर स्वरूपाची असल्याचे सांगत कारवाईचे संकेत देणाऱ्या शरद पवार यांनी आज आपली भूमिकेत बदल करत धनंजय मुंडे यांच्या मंत्रीपदावरची टांगती तलवार काढून घेतली आहे. आरोप करणाऱ्या व्यक्तीबाबतच तक्रारी समोर आल्याने या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे अशा निष्कर्षावर आम्ही आलो आहोत. तपासात एसीपी दर्जाची माहिला अधिकारी नियुक्त करण्याची सूचना आम्ही केल्याचे शरद पवार यांनी आज सांगितले.
रेणू शर्मा नावाच्या महिलेने केलेले बलात्काराचे आरोप व विवाहबाह्य संबंधांची स्वतःच दिलेली कबुली यामुळे धनंजय मुंडे चांगलेच अडचणीत आले होते. पक्षाध्यक्ष शरद पवार यांनीही मुंडे यांच्यावरील आरोप गंभीर स्वरूपाचे असल्याने पक्ष सहकाऱ्यांशी चर्चा करून कारवाई केली जाईल असे स्पष्ट करत कारवाईचे संकेत दिले होते. परंतु धनंजय मुंडे यांच्यावर आरोप करणाऱ्या या महिलेने आपल्यालाही ‘हनीट्रॅप’ मध्ये अडकवून ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला होता असा आरोप भाजप नेते व माजी आमदार कृष्णा हेगडे, मनसेचे पदाधिकारी मनीष धुरी व आणखी एका व्यक्तीने केल्याने या संपूर्ण प्रकरणाला कलाटणी मिळाली. केवळ आरोपांमुळे धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेणे योग्य नाही, अशी ठाम भूमिका राष्ट्रवादीच्या काही नेत्यांनी आधीपासूनच घेतली होती. त्यातच ही नवी माहिती पुढे आल्यानंतर त्यांना बळ मिळाले होते.
या घडामोडी समोर आल्यानंतर शरद पवार यांनी आपली भूमिका मवाळ करत मुंडे यांच्या राजीनाम्याच्या चर्चेला पूर्णविराम दिला आहे. आरोप करणाऱ्यावर एकाहून अधिक आरोप झाले त्याबाबतही सत्यता जाणून घेण्याची गरज आहे. आरोप झाला म्हणून सत्तेपासून दूर व्हा असे प्रकार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पूर्ण शाहनिशा करुन पुढची पावलं टाकणार आहोत, असे पवार यांनी स्पष्ट केले.
काल याबाबत बोललो तेव्हा हे सर्व मला माहिती नव्हतं. एखाद्या भगिनीने तक्रार केल्यानंतर त्याची नोंद गांभीर्याने घेतली पाहिजे या भावनेने मी ‘गंभीर’ हा शब्द वापरला होता. मात्र आता अधिक खोलात जाऊन वास्तव पुढे आणण्याची गरज असल्याचे पवार यांनी सांगितले. भाजपाचं काय म्हणणं आहे माहिती नाही. काळजीपूर्वक चौकशी केली पाहिजे असं त्यांच्या मोठ्या नेत्याने म्हटलं आहे. त्यांच्याच पक्षातल्या माजी आमदाराने आपला अनुभव सांगितल्यानंतर भाजपा किंवा अन्य कोणी काय म्हणत असेल तर कदाचित ते टीका करण्याची संधी म्हणून करत असावेत. त्यावर काही बोलायचं नाही. हा त्यांचा अधिकार आहे, असे पवार म्हणाले. ज्यांच्या हातातून सत्ता गेली आहे त्यांची अस्वस्थता समजू शकतो. ती गेल्यामुळे नाराजी असणार. त्यासाठी ज्यांनी हे सगळं काम केलं असेल त्यांना टार्गेट करुन त्यांना ठोकण्याचं काम करणं हे फारसं वेगळं समजत नाही. हे राजकारणात आक्रमपणे आरोप करणं आणि भूमिका घेण्याचा भाग आहे,असा टोलाही त्यांनी या प्रकरणात आक्रमक भूमिका घेणाऱ्या विरोधकांना लगावला.
कृषि कायदे स्वागतार्ह पण शेतक-यांना सुरक्षाही द्या