23.8 C
Latur
Tuesday, September 27, 2022
Homeमहाराष्ट्रधनंजय मुंडेंवर दया, ‘करुणा’ दाखवली ; परत दाखवणार नाही

धनंजय मुंडेंवर दया, ‘करुणा’ दाखवली ; परत दाखवणार नाही

एकमत ऑनलाईन

मुंबई : मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीसांनी धनंजय मुंडेंवर प्रेम, दया, ‘करुणा’ दाखवली. मात्र, आता परत परत दया, ‘करुणा’ दाखवणार नाही, अशी तुफान फटकेबाजी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अधिवेशनात केली. राज्याचे नाथ म्हणवणा-या एकनाथ शिंदे यांनी ‘एकनाथ’च राहावे, ‘ऐकनाथ’ होऊ नये, अशी कोपरखळी आज अधिवेशनात धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री शिंदेंना लगावली. त्याला मुख्यमंत्री शिंदेंनी आपल्या खास शैलीत प्रत्युत्तर दिले.

परत करुणा दाखवणार नाही
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासून सभागृहाबाहेर धनंजय मुंडे आमच्याविरोधात घोषणा देत आहेत. अगदी कट्टर शिवसैनिक असल्याप्रमाणे बेबींच्या देठापासून ‘ताट वाटी, चलो गुवाहाटी’, असे म्हणत आमच्यावर निशाणा साधत आहे. पण, तुमचाही प्रवास मला माहिती आहे. फडणवीसांनी तुमच्यावर प्रेम, दया, ‘करुणा’ दाखवली म्हणूनच तुम्ही आता घोषणा देऊ शकत आहात. पण, परत परत अशी दया, करुणा दाखवता येणार नाही, असा सूचक इशाराही शिंदेंनी मुंडेंना दिला.

दरम्यान, आज नगराध्यक्षांच्या थेट निवडीवरुन मुख्यमंत्री शिंदेंवर विरोधकांनी टीकेची झोड उठवली. विरोधी पक्षनेते अजित पवारांसह छगन भुजबळ, जयंत पाटील, शिवसेनेचे आमदार भास्करराव जाधव यांनी शिंदेंवर टीका केली. भास्करराव जाधव म्हणाले की, मुख्यमंत्र्यांनी आता स्वत: निर्णय घेण्यास सक्षम व्हायला हवे. कुणाचा दबाव आहे किंवा कुणी बंदूक रोखली म्हणून निर्णय घेणे चुकीचे आहे.

करेक्ट कार्यक्रम केला की नाही?
भास्करराव जाधवांच्या टीकेला मुख्यमंत्री शिंदेंनी आपल्या खास शैलीत उत्तर दिले. मुख्यमंत्री म्हणाले, मी सक्षम नसतो तर एवढा मोठा कार्यक्रम केला असता का? करेक्ट कार्यक्रम झाला की नाही? निर्णय घेण्याबाबत माझ्यावर कुणाचाही दबाव नाही. देवेंद्रजी और मे है साथ साथ, मेराभी नाम है एकनाथ , असे म्हणत त्यांनी आपल्यावर देवेंद्र फडणवीस यांचा कोणताही दबाव नसल्याचे सांगितले. जे जनता बोलेल, तेच सरकार करणार, असे शिंदे म्हणाले.

उद्धव ठाकरेंनाही टोला
उद्धव ठाकरेंचे नाव न घेता अजित पवारांना उद्देशून मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, फडणवीस आणि मी एकमेकांचे ऐकून घेत निर्णय घेतो. मात्र, ते तुमचेच ऐकत होते आणि सगळा प्रॉब्लेम तिथेच झाला. आता आमचे सरकार आले असले तरी आम्ही विरोधी पक्षाचा मान, सन्मान ठेवून बहुमताच्या जोरावर कुठलेही काम करणार नाही. तुमच्याही मतांचा सन्मान ठेवला जाईल, अशी ग्वाही शिंदेंनी दिली.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या