मुंबई: अखेर उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीत युती झाली आहे. प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरे यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन युतीची घोषणा केली. त्यामुळे महाविकास आघाडीत चौथा भिडू मिळाला आहे.
वंचित आघाडी आणि ठाकरे गट आगामी निवडणुका एकत्रितपणे लढणार आहे. त्यामुळे भाजप आणि शिंदे गटासाठी मोठे आव्हान उभे राहणार आहे. याशिवाय या नव्या युतीचे राजकीय आणि सामाजिकदृष्ट्या दूरगामी परिणाम होणार आहेत.
यावेळी ठाकरे गटाचे नेते सुभाष देसाई यांनी युती संदर्भातील प्रास्ताविक केले. यावेळी संजय राऊतहेही उपस्थित होते. ज्या स्वप्नाची महाराष्ट्राची जनता वाट पाहत होते. यापूर्वी असा प्रयोग झाला. पण प्रकाश आंबेडकर आणि आम्ही पहिल्यांदाच एकत्र आलो आहोत, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
देश प्रथम म्हणून एकत्र आलो
आंबेडकर आणि ठाकरे या नावाला इतिहास आहे. आमचे आजोबा एकमेकांचे समकालीन आणि एकमेकांचे सहकारी होते. दोघांनीही त्या काळातील वाईट प्रथांवर प्रहार केले. आताही राजकारणात वाईट प्रघात सुरू आहे. त्यामुळे आम्ही एकत्र आलो आहोत. देश प्रथम हा मुद्दा महत्त्वाचा घेऊनच आम्ही एकत्र आलो आहोत, असंही उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
परंपरा आणि चाली चाललेल्या आहेत त्या मोडून तोडून टाकण्यासाठी या दोन्ही पिढ्यांचे वारसदार आमच्यासोबतचे जे सहकारी आहेत. ते एकत्र येऊन काम करणार आहोत, असंही त्यांनी सांगितले.
वैचारिक प्रदूषण संपवायचंय
एक भ्रम पसरवला जातो. हुकूमशाहीकडे अशीच वाटचाल होत असते. जनतेला भ्रमात ठेवायचे. नको त्या वादात अडकवायचे आणि आपले इप्सित साध्य करायचे हे सुरू आहे. याच वैचारिक प्रदूषणातून देशाला मोकळा श्वास घेण्यासाठी आणि देशातील लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी. संविधानाचे पावित्र्य अबाधित ठेवण्यासाठी आम्ही एकत्र येत आहोत. राजकीय वाटचाल कशी असेल ते परिस्थितीनुसार निर्णय घेऊ, असे त्यांनी सांगितले.
तळागाळातील जनतेपर्यंत जे काही देशात चाललं आहे. ते पोहोचवण्याची गरज आहे. परवा पंतप्रधान आले. सभेला कोण आले. कुठून आले. त्यांना काय सांगितलं. निवडणुका आल्यावर गरिबांचा उदोउदो करायचा अन् निवडणुका गेल्यावर गरीब रस्त्यावर आणि त्यांची उड्डाण सुरू असतात. ते रोखण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत, असंही त्यांनी सांगितलं.
संभाव्य संकट रोखण्यासाठी : सुभाष देसाई
गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरू होती. आंबेडकर आणि ठाकरे यांच्यात दोन बैठकाही झाल्या. देशात एक वातावरण आहे. त्यानुसार देश हुकूमशाहीकडे चालला आहे. जनतेच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केले जात आहे. नको त्या गोष्टीकडे लक्ष जात आहे. त्यामुळे देश भरकटवण्याचं काम सुरू आहे. या पार्श्वभूमीवर देशाचा भवितव्याचा विचार करून दोन्ही नेत्यांनी एकत्र यायचे ठरवले. संभाव्य संकट रोखण्यासाठी या दोन्ही शक्तींनी युती करण्याचा निर्णय घेतला आहे, असे सुभाष देसाई यांनी सांगितलं.