कोरोनाची भीती दाखवत सर्पदंश झालेल्या रुग्णाला दिला डिस्चार्ज; घरी नेताना मृत्यू

  323

  डाॅक्टर साक्षात यमदुतच ठरले : अवघ्या दीड तासांत डिस्चार्ज देण्यात आल्याने तासाभरातच त्या मजुराचा दुर्देवी मृत्यू

  हातकणंगले : वरिष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे राजकारण आणि मनमानी कारभारामुळे सध्या छत्रपती प्रमिलाराजे शासकीय रुग्णालय वादग्रस्त बनले असतानाच विषारी सापाने दंश केलेल्या एका मजुरासाठी येथील एक डाॅक्टर साक्षात यमदुतच ठरले आहे. रुग्णालयात एक दिवस तरी दाखल करुन घेण्याची नातेवाईकांनी विनंती केली. तरी कोरोनाची भिती दाखवुन, अवघ्या दीड तासांत डिस्चार्ज देण्यात आल्याने तासाभरातच त्या मजुराचा दुर्देवी मृत्यू झाला. महेश उर्फ संभाजी हिंदुराव सुभेदार (34, रा. रेंदाळ,ता. हातकणंगले) असे या मजुरांचे नाव आहे.

  Hatkangale News 2

  संबंधित डाॅक्टरांच्या हलगर्जीपणामुळे कमावत्या मजुराचा मृत्यु होऊन त्यांची दोन्ही लहान मुलं आणि वृद्ध आई निराधार झाली. त्यामुळे संबंधित डाॅक्टरावर कारवाई करण्याची मागणी स्थानिक ग्रामस्थांकडुन करण्यात येत आहे. लवकरच याबाबत पालकमंत्री, जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात येणार आहे.

  रेंदाळ येथील महेश उर्फ संभाजी सुभेदार हा गेल्या काही वर्षांपासून 10 व 12 वर्षाच्या दोन लहान मुले आणि वृद्ध आईसह मिळेल ती मोलमजुरी करून उदरनिर्वाह करत होता. शुक्रवारी 22 मे रोजी सायंकाळी सर्पदंश झाल्याने ग्रामस्थांनी उपचारासाठी हुपरी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. अर्धा तासांतच हुपरी रुग्णालयातुन 108 रुग्णवाहिकेतून या मजुराला छत्रपती प्रमिलाराजे शासकीय रुग्णालय (सीपीआर) मध्ये दाखल करण्यात आले. यावेळी सीपीआर येथील महिला वैद्यकिय अधिकारी यांना दंश झालेला सर्प विषारी असून रुग्णावर तातडीने उपचार करण्याची विनंती नातेवाईकांनी केली. दंश केलेला मृतसर्प सोबत आणून तो नाग सर्प असल्याची विनवणी करत असतानाही वैद्यकिय अधिकारी यांनी दंश झालेला सर्प बिन विषारी आहे. काळजी करण्याचे कारण नाही, असे सांगत जुजबी उपचार करून अवघ्या दीड तासात डिस्चार्ज दिला. यावेळी नातेवाईकांनी निदान एक दिवस तरी वैद्यकिय निरीक्षणाखाली येथे राहू देण्याची विनंती केली.

  Read More  12 हजार रुपये पेंशन : एलआयसीने सुरू केली बंद झालेली सरकारची ही योजना

  येथे कोरोनाचे रुग्ण आहेत. तुमच्या पेशंटला कोरोनाची बाधा झाली तर आम्ही जबाबदार नाही. हा सर्प विषारी नाही. तुम्ही रुग्णास घरी घेवून जा असा सल्ला येथील उपचार करणाऱ्या महिला अधिकाऱ्यांनी दिला. त्यामुळे नाइलाजाने सर्पदंश झालेल्या या रुग्णांला घरी घेऊन येत असतानाच त्याचा वाटेत मृत्यू झाला. नातेवाईकांनी परत सीपीआर रुग्णालय गाठले असता त्याला मृत घोषित करण्यात आले. पहाटे शवविच्छेदन करण्यात आले. शवविच्छेदन अहवालात शरिरात सर्पदंशाने विष पसरुन मृत्यू झाल्याचे नमूद केले आहे.