जळगाव : स्वराज्य पक्षाचे नेते, माजी खासदार संभाजीराजे छत्रपती आणि भाजपचे नेते, राज्याचे मंत्री गिरीश महाजन या दोन्ही नेत्यांमध्ये बंददाराआड चर्चा झाली. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या दोन नेत्यांची चर्चा झाल्याचे सांगितले जात आहे. या दोन्ही नेत्यांची अचानक भेट झाल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. तसेच संभाजीराजे आणि भाजपच्या जवळकीची चर्चाही रंगली आहे.
संभाजीराजे छत्रपती हे एका कार्यक्रमासाठी जळगावात आले होते. येथील अजिंठा विश्रामगृहात या दोन्ही नेत्यांची भेट झाली. यावेळी गिरीश महाजन यांनी संभाजीराजेंचे स्वागत केले. यावेळी भाजपचे आमदार मंगेश चव्हाण यांचीही उपस्थिती होती. विशेष म्हणजे यावेळी राष्ट्रवादीचे बंडखोर नेते संजय पवार यांचीही यावेळी उपस्थिती चर्चेचा विषय ठरली. दोन्ही नेत्यांची खासगीत अर्धा ते पाऊण तास चर्चा झाल्याची चर्चा आहे. त्यामुळे या भेटीचे राजकीय अर्थ काढले जात आहेत. तर गिरीश महाजन यांनी मात्र ही राजकीय भेट नसल्याचा दावा केला आहे.