मुंबई : आमच्या चिन्हाची चोरी केली आहे. या चोरीचा म्होरक्या कोण आहे हे आम्ही शोधणार आहोत. लवकरच या चोरीच्या सरदाराबाबत खुलासा करणाार आहोत. चिन्ह चोरीत दिल्लीच्या मोठ्या लोकांचा सहभाग आहे. या चोरांबाबत जनतेलादेखील जागृत करणार आहोत, असे सांगत नवीन चिन्हाबाबत आमच्या चर्चा सुरू आहेत, अशी माहिती ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दिली आहे.
संजय राऊत आज कोकण दौ-यावर होते. मुंबईत परत आल्यानंतर त्यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी माध्यमांसोबत संवाद साधला. धनुष्यबाण हे पक्षचिन्ह हातातून गेल्यानंतर ठाकरे गटाकडून आता नवीन पक्षचिन्ह मिळवण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. संजय राऊत यांनी शनिवारी याबाबत सूचक वक्तव्य केले. उद्धव ठाकरेंची भेट घेतल्यानंतर ते म्हणाले की, आजच मी कोकणात जाऊन आलो आहे. तेथील कार्यकर्त्यांसोबत बोलणे झाले असून नवीन चिन्हाबाबत आमची चर्चा सुरू आहे, असे ते म्हणाले.