नवी दिल्ली: वृत्तसंस्था
श्रीलंकेचे अध्यक्ष गोताबाया राजपक्षे आणि मॉरिशसचे पंतप्रधान प्रविंद जुगनौथ यांच्याशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाविषयी शनिवारी चर्चा केली. राजपक्षे यांच्या नेतृत्वाखाली श्रीलंका अत्यंत परिणामकारपणे कोरोनाशी लढत असल्याचे ट्विट पंतप्रधान मोदी यांनी केले.
आपल्या अतिशय जवळच्या मॉरिशसलाही कोरोनाशी लढण्यास आणि अर्थव्यवस्थेवरील परिणाम भरून काढण्याच्या दृष्टीने भारताचा नेहमीसारखाच पूर्ण पाठिंबा असेल, असेही त्यांनी सांगितले. अर्थव्यवस्था पुन्हा नव्याने कार्यान्वित करण्यासाठी श्रीलंकेच्या प्रयत्नाची माहिती अध्यक्ष राजपक्षे यांनी मोदींना दिली. या पार्श्वभूमीवर भारताच्या सहकार्यातून विकसित झालेल्या श्रीलंकेतील प्रकल्पांना गती देण्यास दोन्ही देश तयार असून, भारतीय खासगी क्षेत्रातही श्रीलंकेची गुंतवणूक करण्याची तयारी असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले.
Read More देशात २४ तासांत ६,३७८ नवे रुग्ण, मृत्यू १४४
अम्फान चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानाबद्दल जुगनौथ यांनी मोदी यांच्याकडे शोक व्यक्त केला. कोरोनाच्या लढाईत मदत करण्यासाठी १४ आरोग्यसेवकांचा गट औषधांसह मॉरिशसला पाठविल्याबद्दल त्यांनी मोदी यांचे आभारही मानले. आॅपरेशन सागरअंतर्गत भारतीय नौदलाचे केसरी नावाचे जहाज मॉरिशसला मदतीसाठी पाठविण्यात आले होते.
आयुर्वेदाच्या शिक्षणासाठी निमंत्रण
मॉरिशसलाही आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी मदत करण्याबरोबरच मॉरिशसमधील अधिकाधिक तरुणांना आयुर्वेदाच्या अभ्यासासाठी भारतात येण्याचे आमंत्रण देतानाच, त्यासाठी सुविधा उपलब्ध करून देण्याचे आश्वासनही मोदी यांनी जुगनौथ यांना दिले.