26.6 C
Latur
Thursday, August 18, 2022
Homeमहाराष्ट्रसामंत-राऊत यांच्यातील वाद विकोपाला

सामंत-राऊत यांच्यातील वाद विकोपाला

एकमत ऑनलाईन

चिपळूण : रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे खासदार विनायक राऊत आणि आमदार उदय सामंत दोघे एकेकाळचे मित्र; मात्र आमदार सामंत यांनी शिवसेनेच्या विरोधात बंडखोरी केल्यापासून दोघांच्या मैत्रीमध्ये वितुष्ट निर्माण झाले आहे. खासदार राऊत यांनी सामंत यांच्यावर टीका करताना त्यांना गद्दार ठरवले.

त्यानंतर सामंत यांनी पत्रातून राऊत यांच्यावर नाराजी व्यक्त केली. त्यामुळे दोघांमधील वाद आता विकोपाला गेला आहे. रत्नागिरीचे आमदार उदय सामंत राष्ट्रवादीतून शिवसेनेत आले. त्यानंतर खासदार राऊत यांच्या लोकसभेच्या पहिल्या निवडणुकीपासून दोघे एकत्र होते. शिवसेनेचे खासदार असलेले विनायक राऊत यांचे ‘मातोश्री’पर्यंत जवळचे संबंध होते. त्यांनी नेहमीच आमदार सामंत यांना झुकते माप देण्याचा प्रयत्न केला.

सामंत यांना फडणवीस सरकारमध्ये ‘म्हाडा’चे अध्यक्षपद असो किंवा ठाकरे सरकारमध्ये कॅबिनेट मंत्रिपद देण्यात राऊत यांची भूमिका महत्त्वाची होती. रत्नागिरी जिल्ह्यातील शिवसेनेचे अनेक निर्णय दोघे एकमेकांच्या सल्ल्याने घेत होते. त्यामुळे शिवसेनेतील दुसरा गट नाराज व्हायचा.

नाराज गटाने खासदार राऊत यांच्या विरोधात काम करण्याचाही प्रयत्न केला; परंतु सामंत आणि राऊत यांची मैत्री दिवसेंदिवस घट्ट होत चालली होती. राऊत यांच्यासाठी सामंत यांनी माजी खासदार निलेश राणे यांनाही अनेकवेळा अंगावर घेतले; मात्र काही दिवसांपासून दोघांमध्ये दुरावा निर्माण झाला होता.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेविरोधात बंडखोरी केल्यानंतर आमदार सामंत शिंदे गटात सामील झाले. त्यानंतर राऊत आणि सामंत यांच्यातील खुले राजकीय युद्ध सुरू झाले. रत्नागिरी येथे शिवसेनेचा मेळावा घेऊन खासदार राऊत यांनी आमदार सामंत यांच्यावर टीका केली. ‘शिवसेनेने सर्वकाही देऊनसुद्धा तुम्ही बंडखोरी केली. शिवसेना संपवण्यात भागीदार झाल्यास तुमची जागा नरकात असेल,’ असे सांगत आमदार सामंत यांना खासदार राऊत यांनी गद्दार ठरवले.
गुवाहाटीला जाईपर्यंत सर्वांना जोडण्याचा प्रयत्न

दरम्यान, मी गुवाहाटीला जाईपर्यंत सर्वांना जोडण्याचा प्रयत्न करत होते. त्याचे साक्षीदार राऊत आणि अनिल देसाई आहेत; पण शिवसेनेतील काहीजणांना शिंदे आणि ठाकरेंचे मनोमिलन नको होते. त्यांची नावे मी लवकरच जाहीर करणार असल्याचे सामंत यांनी सांगितले आहे. मी कालही शिवसेनेत होतो, आजही आहे; पण बंडखोरी का केली, हे भविष्यात स्पष्ट होईल, असे सामंत यांनी सांगितले; मात्र रत्नागिरीच्या राजकारणात सामंत विरुद्ध राऊत असे गट पडल्याचे स्पष्ट झाले आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या