नवी दिल्ली: वृत्तसंस्था
सर्व पात्र कर्जदारांना तीन सीची (सीबीआय, सीव्हीसी व सीएजी) भीती न बाळगता कर्ज द्या, असे आदेश केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बँकांना दिले आहेत. पक्षाचे नेते नलिन कोहली यांच्याशी केलेल्या संवादाचा व्हीडीओ भाजपने सोशल मीडियावर प्रसारित केला असून, त्यात सीतारामन यांनी हे आदेश दिले आहेत. मी कालच (शुक्रवारी) सर्व बँकांच्या सीईओ आणि व्यवस्थापकीय संचालकांशी चर्चा केली आहे.
सरकारने कर्जांना १०० टक्के गॅरंटी दिली असल्याने बँकांना कर्ज देताना घाबरण्याची गरज नाही, अशा स्पष्ट सूचना त्यांना दिल्या आहेत. जर एखाद्याने कर्ज थकविलेच, तर कोणाही अधिकाºयावर वा बँकेवर कारवाई होणार नाही हे कालच स्पष्ट केले आहे. मी पुन्हा स्पष्ट करते की जर एखादा निर्णय चुकलाच किंवा नुकसान झाले, तर सरकारने १०० टक्के हमी दिली आहे. कोणत्याही बँक अथवा अधिकाºयावर त्याचा ठपका येणार नाही. त्यामुळे कोणत्याही भयाविना बँकांनी त्यांनी प्रत्येक पात्र कर्जदारास अतिरिक्त कर्ज आणि अतिरिक्त भांडवल द्यावे, असे सीतारामन म्हणाल्या.
Read More …तर मुख्यमंत्र्यांवर ‘मंत्रीकपात’ करण्याची वेळ येईल- संजय राऊत
सीबीआय, सीव्हीसी (दक्षता आयोग) आणि सीएजी (कॅग) यांच्या भीतीमुळे पात्र कर्जदारांना कर्ज देण्याचीही बँकांना भीती वाटत असल्याची चर्चा बॅकिंग वर्तुळात सुरू आहे. ही भीती दूर करण्यासाठी सरकारने भीतीस कारणीभूत असलेल्या काही अधिसूचना मागे घेतल्याचेही सीतारामन म्हणाल्या.
हॉस्पिटॅलिटी, आॅटो आणि नागरी विमानउड्डाण क्षेत्राला आर्थिक पॅकेजमध्ये दुर्लक्षित केल्याच्या टीकेवर त्या म्हणाल्या, सरकारने क्षेत्रनिहाय दृष्टीकोन स्वीकारलेला नसून, सार्वत्रिक दृष्टीकोन स्वीकारला आहे. फक्त कृषी आणि ऊर्जा क्षेत्रात केलेल्या सुधारणांसाठी सरकारने काही निर्णय घेतले आहेत. मात्र, अन्य कोणत्याही सवलतींसाठी मी विशिष्ट क्षेत्राचा उल्लेख केलेला नाही. लघु, मध्यम व सूक्ष्म (एमएसएमई) क्षेत्रासाठी तरतूद केली असली, तरी ती त्याच्याशी संबंधित अन्य क्षेत्रांनाही लागू आहे. त्यामुळे पॅकेजचा फायदा सर्वांना होईल.
एक जूनपासून बँकांकडून बाजारात रोखता उपलब्ध होईल. लोकांना सहजसुलभ पद्धतीने कर्ज मंजूर करा आणि शक्यतो डिजिटल पद्धतीने कर्ज प्रक्रिया राबवा यावर आपण बँकांशी चर्चेत भर दिला असल्याचे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटले आहे़