21.9 C
Latur
Monday, August 15, 2022
Homeराष्ट्रीयपुढील सुनावणीपर्यंत आरेतील एकही झाड तोडू नका

पुढील सुनावणीपर्यंत आरेतील एकही झाड तोडू नका

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : मेट्रो-३ प्रकल्पाच्या कारशेडसाठी आरे दुग्ध वसाहतीतील वृक्ष तोडण्याविरोधात पर्यावरणप्रेमींनी केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारच्या वृक्षतोडीविरोधात निर्देश दिले आहेत. मेट्रो ३ (कुलाबा-वांद्रे-सीप्झ) मार्गिकेतील आरे कारशेडच्या कामासाठी पुढील सुनावणीपर्यंत आरेतील एकही झाड कापू नये, असे निर्देश शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकार आणि मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनला (एमएमआरसी) दिले. पुढील सुनावणी १० ऑगस्टला होणार आहे.

राज्य सरकारने आरेतील कामाला देण्यात आलेली स्थगिती उठविल्यानंतर एमएमआरसीने मेट्रो ३ च्या गाडीचे डबे आणण्यासाठी अडचण ठरणा-या झाडांच्या फांद्यांची छाटणी सुरू केली. या छाटणीच्या नावाखाली आरेत झाडे अवैधरित्या कापल्याचा आरोप पर्यावरण क्षेत्रातील कार्यकर्त्यांनी केला होता. आरेतील झाडे कापण्यास सर्वोच्च न्यायालयाची बंदी असताना झाडे कापण्यात आल्याचा आरोप करून पर्यावरणप्रेमींनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यावर शुक्रवारी न्यायमूर्ती उदय लळीत यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर सुनावणी झाली. यावेळी न्यायालयाने पुढील सुनावणीपर्यंत एकही झाड कापू नये, असे आदेश दिले.

मेट्रो-३ प्रकल्पाच्या कारशेडसाठी आरे दुग्ध वसाहतीतील वृक्ष तोडण्याविरोधात पर्यावरणप्रेमींनी केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती उदय लळित यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर आज सुनावणी झाली. यापूर्वी न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर या प्रकरणी सुनावणी होणार होती.

राज्यात सत्तांतर झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने मेट्रो-३ प्रकल्पाची कारशेड कांजूरमार्ग येथून पुन्हा आरे वसाहतीत हलवण्यात येत असल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर कारशेडचे कामही सुरू झाले होते. वृक्षतोडीलाही सुरुवात करण्यात आली. या निर्णयाच्या विरोधात पर्यावरणप्रेमींनी आरेत आंदोलन केले. तसेच प्रकल्पासाठी केल्या जाणा-या आरेतील वृक्षतोडीबाबत परिस्थिती ‘जैसे थे’ ठेवण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वी दिलेले असतानाही वृक्षतोड करण्यात आली, असा दावा करून पर्यावरणप्रेमींनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. यासंदर्भात आज ही सुनावणी न्यायमूर्ती लळित यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर झाली. यावेळी न्यायालयाने वृक्षतोड करू नये, एकही झाड तोडू नये असे स्पष्ट निर्देश सरकारला दिले.

म्हणून लळित यांच्या अध्यक्षतेखाली सुनावणी
नियमानुसार, सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा यांनी गुरुवारी केंद्र सरकारला पत्रव्यवहार करून भावी सरन्यायाधीश म्हणून ज्येष्ठता क्रमवारीत दुस-या क्रमांकावर असलेल्या न्यायमूर्ती लळित यांच्या नावाची शिफारस केली आहे. त्यामुळे न्यायमूर्ती लळित यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर सुनावणी आज पार पडली.

१० ऑगस्टला पुढील सुनावणी
आरे येथे प्रस्तावित कारशेडच्या जागेतील एकही झाड कापण्यात आले नसून आम्ही केवळ झुडपे कापल्याची माहिती यावेळी एमएमआरसीकडून न्यायालयात देण्यात आली. आता पुढील सुनावणी १० ऑगस्टला होणार आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या