22.4 C
Latur
Thursday, September 29, 2022
Homeराष्ट्रीयचित्त्यांसाठी हरणांचा बळी नको ; बिश्नोई समाजाने पंतप्रधान मोदींना लिहिले पत्र

चित्त्यांसाठी हरणांचा बळी नको ; बिश्नोई समाजाने पंतप्रधान मोदींना लिहिले पत्र

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भारतात दक्षिण आफ्रिकेतून आठ चित्ते आणले गेले. त्यानंतर ते मध्य प्रदेशातील कुनो नॅशनल पार्कमध्ये सोडण्यात आले आहेत. या चित्त्यांना खाद्य म्हणून १८० हरीण व चितळ सोडण्­यात आले आहेत. यामुळे बिश्नोई समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या.

राजस्थान, हरियाणा आणि मध्य प्रदेशमधील बिश्नोई समाज सरकारच्या निर्णयावर आक्रमक झाला असून, या निषेधार्थ त्­यांनी हरियाणात धरणे आंदोलनही सुरू केले आहे. तसेच, पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहित चित्त्यांसाठी हरणांचा बळी नको अशी विनंती बिश्नोई समाजाने केली आहे.

अखिल भारतीय बिश्नोई महासभेचे अध्यक्ष देवेंद्र बुडिया यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवून मध्य प्रदेशातील कुनो नॅशनल पार्कमध्ये नामिबियातून आणलेल्या ८ चित्त्यांची भूक भागवण्यासाठी राजगडच्या जंगलातून श्योपूरला १८० चितळ आणि हरिण पाठवण्यात आल्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. देवेंद्र बुडिया यांनी पंतप्रधान मोदींना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, भारत सरकारने आपल्या नेतृत्वाखाली भारतातील जंगलांमधील नामशेष झालेल्या प्रजाती पुनर्संचयित करण्यासाठी नामिबियामधून ८ चित्ते आणले आहेत. परंतु, त्यांचे खाद्य मुख्यत्वे चितळ, हरणे इत्यादी जंगलात सोडल्याने बिश्नोई समाजाच्या भावना दुखावल्या आहेत.

बिश्नोई समाज हा प्राणी, पक्षी आणि वनस्पतींनाही त्यांचा जगण्­याचा हक्क असल्याचे मानतो. या समाजातील लोक हे निसर्गाला देव मानतात. निसर्गातील प्रत्येक घटकाच्या संवर्धनासाठी ते प्रयत्नशील असतात. वन्य प्राणी आणि झाडांसाठी या समाजातील लोक आपला जीवसुद्धा द्यायला तयार असतात.

काळविटाला बिश्नोई समाजात विशेष धार्मिक महत्त्व आहे. काळवीट हे गुरु भवान जंभेश्वर यांचे रूप असल्याचे हा समाज मानतो. त्यांचे आराध्यदैवत असलेले गुरू जंभेश्वर यांनी दिलेल्या २९ नियमांचे पालन करतात. यापैकी एक नियम म्हणजे वन्यजिवांचे संरक्षण आणि झाडांच्या संरक्षणाशी संबंधित आहे. त्यामुळेच ते काळविटाला देवाच्या स्थानी मानतात. काळविटांना त्रास देणे किंवा त्यांची हत्या करणे हा या समाजाच्या दृष्टीने सर्वांत मोठा गुन्हा असल्याचे मानले जाते.

तब्बल ७० वर्षांनंतर भारत देशात चित्ते परतले आहेत. यापूर्वी १९५२ मध्ये देशातून चित्त्याची प्रजात नष्ट झाली होती. भारतातून चित्ते नामशेष झाले होते. सर्वोच्च न्यायालयाने २०२० साली भारतात चित्ते आणण्याची परवानगी दिली.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या