नाशिक : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मी वरळीमधून माझ्यासमोर विधानसभा निवडणूक लढवून दाखवावी, असे आव्हान दिले, परंतु त्यांनी ते स्वीकारले नाही. पण आता आपण दोघे राजीनामा देऊ. तुम्ही वरळी जिंकून दाखवा अन्यथा ते पेलत नसेल तर मी ठाण्यात येऊन लढतो असे खुले आव्हान आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले आहे.
आदित्य ठाकरे हे शिव संवाद यात्रेनिमित्त नाशिक दौ-यावर असून नाशिकरोड येथील आनंद ऋषी शाळेजवळील मैदानात आयोजित सभेत ते बोलत होते यावेळी ठाकरे म्हणाले की, आज दोन गोष्टींचा आनंद आहे की, महिला मोठ्या संख्येने उपस्थित असून कोणत्याही पक्षात महिला शक्ती खूप महत्त्वाची असते. दुसरी आनंदाची गोष्ट म्हणजे अनेक तरुण चेहरे मला दिसत आहेत. सध्या महाराष्ट्रात वातावरण तापलेले आहे.
निवडणूक झाल्यावर दिसेल की शिवसेना एकच आहे, ती माझ्यासमोर बसली आहे. खरे तर नाशिकच्या निवडणुकीत शुभांगी पाटील चांगल्या लढल्या, त्यांचे कौतुक करावे तितके कमी आहे. महाविकास आघाडीसोबत संपूर्ण महाराष्ट्र असल्याचा विश्वास आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला.
ते पुढे म्हणाले, गद्दारी झालेली कोणालाच पटलेली नाही, मात्र आम्ही पाठीत वार केला नाही. हे ४० गद्दार सांगू शकतात का? सुरत, गुवाहाटी, गोवा मार्गे आलेले सांगू शकतील का? ५० खोके एकदम ओके असे लोक त्यांना बोलतात. ही घोषणा सगळीकडे दिली जात आहे. हाऊसमध्ये ते सुद्धा ओके म्हणतात. राज्यकर्त्यांनी स्वत:ला विकून टाकले, का गेले, कोणासाठी गेले, असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.
मुख्यमंत्री पक्षप्रमुख उद्धव ठाकरे झाले, तेव्हा तुम्हाला आनंद नाही झाला. आज मी महाराष्ट्र फिरत आहे… जनतेला सांगतो आहे, मी आहे तिथेच आहे, तुमच्यासाठीच आहे. आपल्या सभेत लोक येतात आणि आम्ही शिवसेनेसोबत आहोत असे सांगतात. मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनी जे काम केले त्यांचे ते फॅन झाले आहेत. जे आपले मतदार नव्हते ते देखील शिवसेनेसोबत आहेत. हे गल्लीचे राजकारण आपल्याला पळवून लावायचे असल्याचे आदित्य ठाकरे म्हणाले.