पुणे : पुण्यातील एका प्रसिद्ध वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारावर विनयभंग करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयातील २९ वर्षीय डॉक्टर तरुणीचा विनयभंग करण्यात आला आहे. त्यानंतर डॉक्टर तरुणीने पोलिसांत धाव घेतली आहे.
रविवारी दुपारी तरुणी महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारावरून जात असताना एक तरुण दुचाकीवरून भरधाव वेगात आला. त्याने तरुणीच्या पार्श्वभागावर चापट मारली. डॉक्टर तरुणी बी. जे. महाविद्यालयात प्रॅक्टिस करते. रविवारी दुपारी तीनच्या सुमारास हा प्रकार घडला. बी. जे. महाविद्यालयाचा रस्ता हा वर्दळीचा आहे. याच वर्दळीच्या रस्त्यावर असा प्रकार घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
डॉक्टर तरुणीने पोलिसांत धाव घेतली आणि घडलेला प्रकार सांगितला. तरुणीने तक्रार दाखल केल्यानंतर बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही पाहून आरोपीचा शोध घेतला जात आहे.
दरम्यान, भर वर्दळीच्या ठिकाणी असा प्रकार घडल्याने महिला सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. बंडगार्डन पोलिसांनी या प्रकरणी आता तपासाला सुरुवात केली आहे. परिसरातील सीसीटीव्ही पाहून आरोपीचा शोध घेतला जात आहे.
दोन दिवसांपूर्वीही असाच प्रकार घडला
या आधी हडपसर परिसरात देखील असाच विनयभंगाचा प्रकार घडला होता. घराजवळ खेळत असलेल्या अल्पवयीन मूकबधिर असलेल्या १० वर्षाच्या मुलीला दोघांनी पळवून नेले होते. त्यानंतर जबरदस्तीने तिला दारू पाजली. तिचे कपडे काढून तिचा विनयभंग करण्यात आला. एकाने तिचे कपडे काढून तिच्याबरोबर अश्लील वर्तन केले आणि दुस-याने तिचे केस ओढून तिचा लैंगिक छळ केला.