स्पष्ट आदेश : गरज भासल्यास इकॉनॉमिक क्लासने प्रवास करु शकता
गरज पडल्यास भाड्याने गाडी घेतली जावी. जास्तीत जास्त बैठकी या व्हिडीओ कॉन्फरन्सींगच्या माध्यमातून होतील.
लखनौ – देशभरात सुरु असलेल्या कोरोनाच्या प्रकोपामुळे अनेक मोठ्या राज्यांसमोर आर्थिक संकट उभे राहिले आहे. या संकटातून बाहेर पडण्यासाठी सर्वच राज्य प्रयत्नशील आहेत. त्यातच लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात ग्रीन झोनमधील उद्योगधंद्यांना परवानगी देण्यात आली आहे. त्याचबरोबर जीवनावश्यक वस्तू विक्रेत्यांना सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून परवानगी देण्यात आल्या आहेत. दरम्यान उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी काही महत्वाच्या सूचना आपल्या मंत्रिमंडळाला केल्या असून त्यानुसार खर्च वाचवण्यासाठी यावर्षी कोणते नवे वाहन खरेदी केले जाऊ नये, असे स्पष्ट आदेशच त्यांनी दिले आहेत.
Read More वाशिममध्ये ‘कोरोना’चा पुन्हा शिरकाव
नव्या योजना, नवे काम गरज नसताना सुरु करु नये, असेही योगी आदित्यनाथ म्हणाले. अनेक पदे नव्या तंत्रज्ञानामुळे रिक्त झाली आहेत. ही पदे सरकार पूर्णपणे बंद करणार आहे. व्हिडीओ कॉन्फरन्सवर सर्वाधिक बैठकी होतील. राज्यातील कोणताच अधिकारी बिझनेस क्लासने प्रवास करणार नाही. इकॉनॉमिक क्लासच्या प्रवाशांना सवलत दिली जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले.
राज्य सरकारांना केंद्र सरकारच्या अनेक योजनांमध्ये आपला वाटा द्यावा लागतो. यापुढे एकरकमी पैसे न देता हफ्त्याने दिले जातील. राज्यात कोणतीही नवी योजना आणण्यात येणार नाही. गरजेच्या नसलेल्या योजनांना स्थगिती देण्यात येणार आहे. सध्या जी कामे सुरु असतील ती कमी खर्चात केली जातील. कोणते नवे काम घेतले जाणार नाही, असे योगींनी सांगितले.
Read More विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचे वाटप; शिक्षणमंत्र्यांची माहिती
अनेक कार्यालयांची कामाची पद्धत कोरोना संकटात बदलली आहे. अनेक जागा रिक्त झाल्या आहेत. ही पदे बंद करावीत. त्याजागी असलेल्यांना इतर ठिकाणी सामावून घ्यावे. कोणतीही नवीन भरती करु नये. सरकारी अधिकारी, कर्मचाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या भत्त्यांमध्ये कपात होणार आहे. स्टेशनरी खरेदीमध्ये २५ टक्के कपात तर विविध विभागांच्या प्रचार आणि प्रसार खर्चातील २५ टक्के खर्च कमी करा, असे देखील मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
त्याचबरोबर राज्यातील मंत्र्यांनी कोणतीही नवीन गाडी खरेदी करु नये. गरज पडल्यास भाड्याने गाडी घेतली जावी. जास्तीत जास्त बैठकी या व्हिडीओ कॉन्फरन्सींगच्या माध्यमातून होतील. गरज भासल्यास इकॉनॉमिक क्लासने प्रवास करु शकता. तसेच या आर्थिक वर्षात कोणते सरकारी संमेलन किंवा वर्कशॉपसाठी हॉटेलमध्ये खर्च होणार नाही.