27 C
Latur
Tuesday, July 5, 2022
Homeमहाराष्ट्रडॉ. तात्याराव लहाने यांच्या रघुनाथ नेत्रालयाचे उद्घाटन संपन्न

डॉ. तात्याराव लहाने यांच्या रघुनाथ नेत्रालयाचे उद्घाटन संपन्न

एकमत ऑनलाईन

मुंबई :डॉ. तात्याराव लहाने यांनी लाखो शस्त्रक्रिया केल्या, कित्येकांना दृष्टी दिली, या सा-या गोष्टींचा आलेख सर्वश्रृत आहे. एखाद्या अंध व्यक्तीची शस्त्रक्रिया झाल्यानंतर जेव्हा त्याच्या डोळ्यांवरची पट्टी काढली जाते आणि तो पहिल्यांदा जग पाहतो, तेव्हा त्याच्या चेह-यावरचा आनंद गगनात मावेनासा असतो. अशा अनेकांच्या चेह-यावरचा आनंद डॉ. लहानेंनी आपल्या कष्टांनी निर्माण केला. त्यांनी कधीही पैशाची अपेक्षा केली नाही, अशा शब्दात राष्ट्रवादीचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी प्रसिद्ध नेत्ररोग तज्ज्ञ पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांच्या रुग्णसेवेच्या कार्याचा गौरव केला.
पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांच्या रघुनाथ नेत्रालयाच्या उद्घाटन कार्यक्रमास आज सर्वपक्षीय नेत्यांनी उपस्थिती लावली. या कार्यक्रमाला शरद पवार, मंत्री बाळासाहेब थोरात, मंत्री धनंजय मुंडे, मंत्री आदित्य ठाकरे, मंत्री अमित देशमुख, मंत्री सुनील केदार, भाजप नेत्या पंकजा मुंडे, खासदार प्रीतम मुंडे उपस्थित होते. डॉ. लहाने यांच्या अफाट कार्याला सर्वपक्षीय नेत्यांनी शुभेच्छा दिल्या. गेली अनेक वर्षे नेत्रचिकित्सा क्षेत्रात अतुलनीय कामगिरी करणा-या डॉ. तात्याराव लहानेंमार्फत आता हे नवीन नेत्रालय उभे राहत आहे. ही आपल्या राज्यासाठी अत्यंत अभिमानाची बाब आहे. या नवीन नेत्रालयामार्फतही गरजूंना दृष्टिदान करण्याचे काम डॉ. लहाने अखंडपणे करत राहतील, असा ठाम विश्वास व्यक्त करत मित्राच्या जावयाचा मला सार्थ अभिमान असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ नेते शरद पवार म्हणाले.
मित्राच्या जावयाचा सार्थ अभिमान : शरद पवार
शरद पवार म्हणाले, डॉ. लहानेंची एक इच्छा होती की, मुंबईमध्ये एक उत्तम नेत्रालय असावे. त्यांची ती इच्छा आज पूर्ण झाली. या नेत्रालयाचे नाव त्यांनी रघुनाथ नेत्रालय ठेवले आहे. रघुनाथराव मुंडे हे माझे सहकारी होते. तसेच ते डॉ. तात्याराव लहाने यांचे सासरेही होते. सध्या ते हयात नाहीत. रघुनाथराव यांच्या निधनानंतरही त्यांच्या कुटुंबाविषयीच्या आस्थेमुळे तात्यारावांसोबतही आमचे स्रेहसंबंध वाढले. विशेषत: राज्य सरकारच्या वैद्यकीय संस्थेमध्ये त्यांनी जे काम केले त्याचा दर्जा आणि त्यांचा दृष्टीकोन पाहिल्यानंतर त्यांच्याविषयीचे आदराचे स्थान आमच्या मनामध्ये निर्माण झाले.

डॉ. लहानेंमुळे अनेकांच्या चेह-यावर आनंद
डॉ. लहाने यांनी लाखो शस्त्रक्रिया केल्या, कित्येकांना दृष्टी दिली, या सा-या गोष्टींचा आलेख सर्वश्रृत आहे. एखाद्या अंध व्यक्तीची शस्त्रक्रिया झाल्यानंतर जेव्हा त्याच्या डोळ्यावरची पट्टी काढली जाते आणि तो पहिल्यांदा जग पाहतो, तेव्हा त्याच्या चेह-यावरचा आनंद गगनात मावेनासा असतो. अशा अनेकांच्या चेह-यावरचा आनंद डॉ. लहानेंनी आपल्या कष्टांनी निर्माण केला.

डॉ. लहानेंचे नाव अग्रक्रमाने
गेली अनेक वर्षे डॉ. लहानेंचे काम सुरू आहे. त्यांनी व त्यांच्या सहका-यांनी सदैव लोकांच्या वैद्यकीय प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी उद्दात काम केलं. मी या देशात जे काही आघाडीचे डॉक्टर्स पाहिले आहेत त्यामध्ये डॉ. लहानेंचे नाव प्रामुख्याने घ्यावे लागेल. लहानशा गावातून एखादी व्यक्ती येते, कर्तृत्ववान होते, आपली कार्यसिद्धता दाखवते आणि मुंबईसारख्या देशाच्या आर्थिक राजधानीत आपला जम बसवते, याचा मला अतिशय आनंद होतो. डॉ. लहानेंचे यासाठी नेहमीच कौतुक करावे लागेल. माझी खात्री आहे की या नव्या नेत्रालयामार्फतसुद्धा अनेकांना दृष्टीदान देण्याचे डॉ. लहानेंचे काम सदैव सुरू राहील, असं म्हणत डॉक्टर लहानेंच्या नव्या वाटचालीसाठी शरद पवार यांनी अंत:करणापासून शुभेच्छा दिल्या.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या