Saturday, September 23, 2023

डॉ. लहाने यांच्यासह ९ अध्यापकांचे राजीनामे

जेजेमधील नेत्र चिकित्सा विभाग बंद पडण्याच्या मार्गावर
मुंबई : जेजे रुग्णालयातील नेत्र शल्यचिकित्सा विभागातील सर्वच म्हणजे ९ अध्यापकांनी राजीनामे दिले आहेत. सहा महिने आधी आलेल्या निवासी डॉक्टरांच्या हट्टापायी डॉक्टरांनी हे पाऊल उचलले आहे. त्यामुळे जेजे रुग्णालयातील नेत्र शल्यचिकित्सक विभाग बंद पडण्याच्या मार्गावर आला आहे. गोरगरिबांसाठी मदत करणा-या आणि मोतीबिंदूमुक्त महाराष्ट्रासाठी काम करणा-या डॉ. तात्याराव लहाने यांनीदेखील राजीनामा दिला आहे. त्यामुळे जेजे रुग्णालयात एकच खळबळ उडाली आहे.

निवासी डॉक्टर संघटनेकडून (मार्ड) डॉ. तात्याराव लहाने आणि डॉ. पारेख यांच्याविरोधात तक्रार करण्यात आली होती. राजीनाम्याच्या मागणीसाठी निवासी डॉक्टर संघटनेने बुधवारपासून (३१ मे) अनिश्चित काळासाठी संप पुकारला होता. एनएमसीच्या नियमांचे पालन होत नसल्याचा मार्डच्या डॉक्टरांचा आरोप होता. मात्र, या प्रकरणी जेजे रुग्णालयातील नेत्ररोग विभागातील डॉक्टरांकडून रुग्णालय प्रशासनाने नेमलेल्या समितीसमोर स्पष्टीकरण दिले होते.

डीएमईआरचे निवृत्त संचालक आणि माजी अधिष्ठाते डॉ. तात्याराव लहाने हे नेत्रशल्यचिकित्सक विभागात मोतिबिंदू शस्त्रक्रिया करत असल्यामुळे त्यांच्या राजीनाम्याने शैक्षणिक अभ्यासक्रमावर त्याचा प्रतिकूल परिणाम होणार आहे. नेत्रशल्यचिकित्सक विभागातील सर्वच अध्यापकांनी राजीनामे दिल्याने संपूर्ण नेत्र विभागच बंद करण्याची नामुष्की जेजे रुग्णालयावर ओढावणार आहे. त्यामुळे रुग्णांचे हाल होणार आहेत. दरम्यान, सर्व डॉक्टर प्राध्यापकांनी राजीनामे देताना जेजे रुग्णालयाच्या अधिष्ठातांविरोधात कारवाई करण्याची मागणी केली आहे.

अध्यापकांविरोधात संपाचे हत्यार
रुग्णालय प्रशासनाला दिलेला अहवाल प्रलंबित असतानादेखील निवासी डॉक्टरांनी आपल्याच नेत्रशल्यचिकित्सक विभागातील अध्यापकांविरोधात संपाचे हत्यार उपसले होते. निवासी डॉक्टरांच्या दबावामुळे नेत्र शल्यचिकित्सक विभागातील सर्वच अध्यापकांनी राजीनामे दिले आहेत.

मार्गदर्शक तत्त्वाच्या उल्लंघनाचा आरोप
नेत्रशल्यचिकित्सक विभागातील डॉक्टर हे राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने आखून दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन करत आहेत, अशी तक्रार जेजे रुग्णालयातील कनिष्ठ निवासी डॉक्टरांनी केली आहे.

Related Articles

More....

लोकप्रिय बातम्या