नांदेड : विशेष प्रतिनिधी
राज्यात मान्सून लवकरच हजेरी लावणार असे भाकित हवामान खात्याने व्यक्त केले होते. १ जूनला पावसाने केरळात हजेरी लावल्यानंतर राज्यात ७ जून पर्यंत पाऊस येण्याची शक्यता वर्तविली जात असतांनाच २ जूनला अचानक दुपारपासून पावसाने नांदेड शहराला चांगलेच झोडपून काढल्यामुळे महापालिकेने शहरात मोठे, छोट्या नाल्यांची सफाई केली असल्याचे सांगीतले असतांनाच मंगळवारी झालेल्या पावसाने महापालिकेचे पितळ उघडे पडल्यामुळे चर्चेचा विषय झाला आहे.
काही दिवसापुर्वी पावसाने शहरामध्ये हजेरी लावली होती. परंतु मंगळवारी दुपारनंतर पावसाने चांगलेच झोडपून काढले. शहरातील सखल भागात अनेक ठिकाणी पाणी साचल्यामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. नवनियुक्त मनपा आयुक्त रुजू होवून जवळपास दोन महिने पूर्ण होत आहेत. महापालिकेने मान्सूनपुर्व तयारी केली असल्याचे आयुक्तांनी जाहिर केले होते. यासंदर्भात महापालिकेकडून लेखी स्वरुपात माहिती प्रसिद्धी माध्यमांना देण्यात आली होती. त्यामुळे महापालिकेने मान्सूनपूर्व तयारी पूर्ण केली असल्याचे सांगितले जात असतांनाच दुसरीकडे मात्र मंगळवारी महाविरचौक, देगावचाळ, पक्कीचाळ, श्रावस्तीनगर, मोर चौक, आनंदनगर, बाबानगर, विवेकनगर आदी प्रमुख नगरांमध्ये सर्वत्र पाणीच पाणी झाले होते. त्यामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. पहिल्याच पावसाने महापालिकेचे पितळ उघडे केल्यामुळे शहरात चर्चेचा विषय झाला आहे.
Read More जिल्ह्यात सेनेकडून होमिओपॅथिक गोळ्यांचा डोस देण्यास प्रारंभ
यासंदर्भात महापालिकेकडून सांगितले जात आहे की, मान्सूनपुर्व तयारी करत असतांनाच दुसºया बाजूला कोरोना सारख्या महामारीवर नियंत्रण आणण्यासाठी महापालिकेची टिम कामाला लागली होती. त्यामुळे म्हणावा तेवढा वेळ मान्सूनपुर्व तयारीला देण्यात आला नाही. त्यामुळे मंळवारी झालेल्या अचानक पावसामुळे शहरात सर्वत्र पाणीच पाणी दिसत होते. परंतु कालांतराने संपूर्ण पाण्याचा मोठ्या नाल्यात निचरा झाला आणि पुन्हा रस्ते स्वच्छ झाले असा दावा महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी करीत आहेत.
शहरामध्ये अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. महापालिकेने यापुर्वी खड्डे बुजविण्याची मोहिम हाती घेतली होती. त्यासंदर्भात संबंधीत ठेकेदारांना बील आदा करण्यात आले आहे. आज त्याच खड्ड्यांनी पुन्हा एकदा तोंड वर काढले असल्यामुळे शहरातील रस्ता कुठला आणि खड्डा कुठला हे शोधण्यात अनेक ठिकाणी किरकोळ अपघात घडले आहेत. २00८ ला गुरुता गद्दी सोहळ्यानिमित्त शहरात आरसीसी रस्ते निर्माण करण्यात आले होते. त्यानंतर या रस्त्यावर आजतगायत कुठलीच देखभाल केली नसल्यामुळे १२ वर्षानंतर देखील महापालिकेला पुन्हा एकदा रस्ते दुरुस्त करण्याची वेळ आली आहे. दिवसेंदिवस महापालिका आर्थिकदृष्ट्या डबघाईत जात असतांना लोकप्रतिनिधींचे याकडे दुर्लक्ष होत आहे. येणारा अधिकारी दोन ते तीन वर्षे काम करुन दुसºया ठिकाणी बदली करुन घेत आहे. त्यामुळे आयुक्त गणेश देशमुख नंतर आलेल्या आयुक्तांनी विशेष लक्ष दिले नसल्यामुळे आज नांदेडकरांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. नवनियुक्त आयुक्त डॉ. सुनील लहाने यांना आता याकडे विशेष लक्ष द्यावे लागणार आहे.