मुंबई : शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. पवारांच्या या निर्णयाचा परिणाम आता मविआच्या वज्रमूठ सभेवर होताना दिसत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कोल्हापूर, नाशिक आणि पुणे येथे होणारी वज्रमूठ सभा रद्द करण्यात आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ‘लोक माझे सांगाती’ या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात राजकीय निवृत्तीची घोषणा केली. त्यानंतर अनेक नेत्यांनी राजीनामादेखील दिला आहे. अशातच राज्यातील होणा-या तीनही सभा रद्द होणार आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, कोल्हापूर, नाशिक आणि पुणे येथे होणारी वज्रमूठ सभा रद्द होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, यासंदर्भात जयंत पाटील यांनी माहिती दिली. उन्हामुळे सभेच्या तारखा बदलण्यात आल्या आहेत. सभा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. यासंदर्भात ही चर्चा १ तारखेलाच झाली होती, असे पाटील म्हणाले.
मात्र, आत्तापर्यंत झालेल्या या सभा सायंकाळी पार पडल्या आहेत. मग पाटील यांनी सभा रद्द होण्याचे कारण कितपत खरं? असा सवाल उपस्थित होत आहे.
महाविकास आघाडी उभी करण्याचे श्रेय सर्वच नेते शरद पवार यांना देतात. मात्र पवार यांनी निवृत्ती जाहीर केल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. पवार यांच्या या भूमिकेमुळे महाविकास आघाडीचे काय होणार, हा मोठा प्रश्न राजकीय वर्तुळात निर्माण झाला आहे.
महाविकास आघाडीतर्फे घेण्यात येणा-या वज्रमूठ सभांपैकी प्रत्येक पक्षाने दोन सभांची जबाबदारी घेतली होती. औरंगाबाद व मुंबईतील सभेच्या आयोजनाची जबाबदारी शिवसेनेची होती; तर नागपूर व कोल्हापूर येथील सभांची जबाबदारी काँग्रेसने घेतली होती.
पुणे व नाशिक येथील सभा राष्ट्रवादी काँग्रेस आयोजित करणार होती. येत्या दोन आठवड्यांमध्ये पुणे येथे वज्रमूठ सभा होणार आहे. मात्र नव्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आता ही सभा बारगळण्याची चिन्हे आहेत.