मुंबई : दत्त दत्त दत्ताची गाय, गायीचं दूध अन् दुधाची साय… ही मराठी कविता वाचत सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारवर लोकसभेत जोरदार टीका केली आहे. ही मराठी कविता वाचत सुप्रिया सुळे म्हणाल्या की, केंद्र सरकारने दत्तगुरू आणि गाय सोडून मधल्या सगळ्या गोष्टींवर जीएसटी लावला आहे. तसेच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या टीकेचा दाखला देत त्यांनी भाजपलाही खडे बोल सुनावले.
आपल्या खिशातून काय जातंय आणि त्याबदल्यात आपल्याला काय मिळते आहे. हीच भाषा सर्वसामान्यांना समजते. मोदी सरकारने कशाकशावर जीएसटी लावलाय हे मी तुम्हाला सांगते. आज मी मराठीतील एक कविता वाचून दाखवते.
दत्त दत्त, दत्ताची गाय, गायीचं दूध, दुधाची साय, सायीचं दही, दह्याचं ताक, ताकाचं लोणी, लोण्याचं तूप. ही कविता ऐकून आम्ही लहानाचे मोठे झालो.
यातील दत्तगुरू भगवान आणि गाय या दोघांना सोडून सर्वांवर मोदी सरकारने जीएसटी लावला आहे. सुदैवाने देवावर जीएसटी लावलेला नाही. जवळपास सर्वच जीवनावश्यक वस्तूंवर केंद्र सरकारने जीएसटी लावला आहे, असा टोला सुप्रिया सुळे यांनी लगावला.
तसेच, सुप्रिया सुळे यांनी ६० वर्षांत काही झाले नाही असे म्हणण्यावरून सुप्रिया सुळे यांनी मोदी सरकारवर टीकास्त्र सोडले. तुम्ही ६० वर्षांकडे बोट दाखवता. पण आठ वर्षेही खूप असतात. एवढ्या काळात नवी सूनही तयार होते, ती घराची जबाबदारी नाकारू शकत नाही, असा टोला सुप्रिया सुळे यांनी लगावला.