26.9 C
Latur
Monday, July 4, 2022
Homeमहाराष्ट्रएकनाथ शिंदेंचे बंड

एकनाथ शिंदेंचे बंड

एकमत ऑनलाईन

मुंबई : शिवसेना नेते आणि राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी जवळपास ३५ समर्थक शिवसेना आमदारांसह बंड पुकारत गुजरातमधील सुरतमध्ये हॉटेल मेरेडियनमध्ये तंबू ठोकल्याने राज्यात राजकीय पेचप्रसंग निर्माण झाला असून, ठाकरे सरकार संकटात आले आहे. त्यानंतर शिंदे यांची बंडाळी मोडून काढण्यासाठी शिवसेनेने प्रयत्न सुरू केले. त्यासाठी प्रथम त्यांची शिवसेनेच्या गटनेतेपदावरून उचलबांगडी करण्यात आली.

त्यानंतर मनधरणीसाठी मुख्यमंत्र्यांचे विश्वासू मिलिंद नार्वेकर आ. रविंद्र फाटक हे दूत म्हणून गुजरातमध्ये पाठविले. सायंकाळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनी थेट एकनाथ शिंदे यांच्याशी फोनवरून संवाद साधला. मात्र, त्यांनी भाजपसोबत जाण्यातच पक्षहित असल्याचे सांगून शिवसेनेने भाजपसोबत सरकार स्थापन करावे, असे म्हटले. मात्र, मुख्यमंत्र्यांनी सर्व सोडा, मला भेटा असे ठणकावल्याने शिंदे काय भूमिका घेणार, याकडे लक्ष लागले आहे.

विधान परिषदेच्या निवडणूक निकालानंतर राज्यात महाविकास आघाडीतील धुसफूस समोर आली. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारचे काय होणार, असा प्रश्न उपस्थित केला जात होता. त्यातच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी शिवसेना आमदारांच्या बैठकीचे आयोजन केले होते. मात्र, तत्पूर्वीच शिवसेनेचे ज्येष्ठ नेते तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतील तब्बल ३५ समर्थक आमदारांसह रात्री उशिरा गुजरातमधील सुरत गाठले आणि सर्वांचे फोन नॉटरिचेबल ठेवण्यात आले.

त्यांची व्यवस्था सुरतमधील पंचतारांकित मेरिडियन हॉटेलमध्ये व्यवस्था करण्यात आली. शिंदे यांच्यासोबत मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्रातील मंत्री आणि आमदार आहेत. याची कुणकुण सकाळी ७ च्या सुमारास लागली. त्यानंतर शिवसेनेच्या नेत्यांनी सर्व आमदारांशी संपर्क साधायला सुरुवात केली. परंतु अनेकांचे फोन नॉटरिचेबल लागायला सुरुवात झाली.

दरम्यान, ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या मंत्री, आमदारांनी बंड केले असून, त्यांना कॉंग्रेस, राष्ट्रवादीसोबत सत्ता नको आहे, तर शिवसेनेने भाजपसोबत जावे. त्यातच पक्षाचे हित आहे, असे या आमदारांचे मत आहे. विशेष म्हणजे शिंदे यांच्या या राजकीय बंडाची साधी कुणकुणदेखील गुप्तचर विभागाला लागली नाही. त्यातच सकाळपासूनच वर्षावर बैठकांचे सत्र सुरू झाले.

तसेच सच्चे शिवसैनिकही रस्त्यावर उतरायला लागले आणि त्यांनी शिंदे यांच्या प्रतिमेचे दहन करतानाच जोरदार घोषणाबाजीही सुरू केली. राज्यात अनेक ठिकाणी शिवसैनिक रस्त्यावर उतरले. त्यातच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या गटनेतेपदावरून शिंदे यांची उचलबांगडी केली आणि ज्येष्ठ आमदार अजय चौधरी यांची नेमणूक केली. परंतु शिवसेनेचे संख्याबळ पाहता गटनेतेपदाचादेखील पेच निर्माण होऊ शकतो.

शिवसेना नेते मिलिंद नार्वेकर, आ. रवींद्र पाठक यांनी सायंकाळी हॉटेल मेरिडियन येथे पोहोचून शिंदे यांच्यासोबत जवळपास अर्धातास चर्चा केली. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनी थेट शिंदे यांच्याशी मोबाईलवरून संवाद साधला. मात्र, शिंदे यांनी भाजपसोबत जाण्यातच पक्षाचे हित असल्याचे सांगितले असून, त्या भूमिकेवर ते ठाम आहेत. मात्र, मुख्यमंत्र्यांनी तुम्ही सर्व सोडून मला येऊन भेटा असे सांगितले. परंतु शिंदे यांना भाजपसोबत जाण्याचे आश्वासन हवे आहे. त्यामुळे शिंदे अजूनही आपल्या भूमिकेवर ठाम आहेत.

दुसरीकडे वर्षावर बैठकांचे सत्र रात्री उशिरापर्यंत सुरूच राहिले. शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्यांच्या बैठकांनंतर सायंकाळी महाविकास आघाडीच्या नेत्यांची वर्षावर बैठक पार पडली. या बैठकीत सद्यस्थितीवर चर्चा झाली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी एकनाथ शिंदे यांचा प्रस्ताव स्वीकारणार नसल्याचे समजते. त्यामुळे शिंदे आपल्या भूमिकेवर ठाम राहिल्यास ठाकरे सरकार कोसळण्याची शक्यता आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या