पिंपरी: चिंचवड मतदार संघाच्या पोट निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहचला आहे. भाजप आणि महविकास आघाडीचे दिग्गज नेते या प्रचारात सहभागी होत आपापल्या उमेदवारांना निवडणूक आणण्यासाठी प्रयत्न करताना पहायला मिळत आहे. निवडणूक आयोगाने देखील या निवडणुकीत नियोजनबध्द रित्या काम सुरू केले आहे.
याशिवाय या मतदार संघातून आचार संहितेच्या अनेक तक्रारी देखील निवडणूक आयोगाकडे आल्या आहेत. त्यातच भाजपच्या चिंचवडच्या उमेदवार अश्विनी जगताप यांना निवडणूक आयोगाने पेड न्यूज प्रकरणात नोटीस बजावल्या माहिती समोर आली आहे. आयोगाकडून त्यांना लेखी खुलासा करण्याचे सांगण्यात आले आहे. याची दखल घेत अश्विनी जगताप यांच्याकडून आयोगाला तातडीने खुलासा देखील पाठवण्यात आला आहे.
भाजप उमेदवार अस्विनी जगपात यांच्याबद्दलची एक बातमी न्यूज पोर्टल आणि एका साप्ताहिकात प्रकाशित करण्यात आली होती. हा एकूणच मजकूर पेड न्यूज सारखा असल्याचे एमसीएमसी समितीच्या निदर्शनास आले होते. यावरून सदर समितीने निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयाला यासंबंधीचे पत्र पाठवले होते.
त्यानुसार, पोट निवडणुकी संबंधित निर्णय अधिकारी सचिन ढोले यांनी १६ फेब्रुवारी रोजी भाजप उमेदवार अश्विनी जगताप यांना नोटीस पाठवली आहे. अश्विनी जगताप यांचे लेखी म्हणणेही आयोगाने मागवले. त्यानंतर २० फेब्रुवारी रोजी निवडणूक आयोगाच्या कार्यालयाला अश्विनी जगताप यांनी खुलासादेखील पाठवला आहे.
एमसीएमसी समितीला यासंबंधीचा खुलासा पाठवण्यात आला आहे. आता ही समिती सदर उत्तराची पडताळणी करणार आहे. त्यानंतर पढील प्रक्रिया निश्चित केली जाईल. त्यामुळे या नोटीस बाबत निवडणूक आयोगाकडून काही कारवाई होते का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. चिंचवड आणि कसबा पेठ पोटनिवडणुकीसाठी २६ फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे.
तर २ मार्चला या दोन्ही पोटनिवडणुकांचा निकाल जाहीर होणार आहे. चिंचवडमध्ये अश्विनी जगताप, राष्ट्रवादीचे नाना काटे आणि अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांच्यात तिरंगी लढत रंगणार आहे. ही पोटनिवडणूक जिंकण्यासाठी भाजप आणि महाविकास आघाडीकडून संपूर्ण ताकद पणाला लावण्यात आली आहे. भाजपने चिंचवड आणि कसबा पेठ मतदारसंघात मंत्री, स्टार प्रचारक अशी मोठी फौज प्रचारासाठी उतरवली आहे.