नवी दिल्ली : भारताला पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठे यश मिळाले असून १ जानेवारी २०२४ पासून चार वर्षांच्या कालावधीसाठी भारताची संयुक्त राष्ट्रसंघाच्या सर्वोच्च सांख्यिकी आयोगावर निवड झाली आहे.परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी ट्विटरवर ही माहिती दिली.
ते म्हणाले की, संयुक्त राष्ट्र सांख्यिकी आयोगाच्या निवडणुकीत भारताने ५३ पैकी ४६ मते मिळवून दणदणीत विजय मिळवला. प्रतिस्पर्धी कोरिया रिपब्लिकला २३, चीनला १९ आणि संयुक्त अरब अमिरातीला १५ मते मिळाली. ते म्हणाले की ही बहुपक्षीय निवडणूक होती, ज्यामध्ये दोन जागांसाठी चार उमेदवार उभे होते.
जयशंकर म्हणाले की, सांख्यिकी, विविधता आणि लोकसंख्याशास्त्र या क्षेत्रातील भारताच्या कौशल्यामुळे संयुक्त राष्ट्रांच्या सांख्यिकी आयोगामध्ये भारताला स्थान मिळाले आहे.
संयुक्त राष्ट्रसंघ सांख्यिकी आयोग काय आहे ?
या संस्थेमध्ये संयुक्त राष्ट्रांच्या २४ सदस्य राष्ट्रांचा समावेश आहे, जे समान भौगोलिक आधारावर संयुक्त राष्ट्र आर्थिक आणि सामाजिक परिषदेच्या वतीने निवडले जातात. सदस्यांमध्ये पाच आफ्रिकन देश, चार आशिया-पॅसिफिक प्रदेशातील, चार पूर्व युरोपमधील, चार लॅटिन अमेरिका आणि कॅरिबियन प्रदेशातील आणि सात पश्चिम युरोपमधील आहेत.
ही आंतरराष्ट्रीय सांख्यिकीय क्रियाकलापांसाठी सर्वोच्च निर्णय घेणारी संस्था आहे, जी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर अंमलबजावणीसह सांख्यिकीय मानकांची स्थापना आणि संकल्पना आणि पद्धतींच्या विकासासाठी जबाबदार आहे.