मुंबई : देशभरात सध्या काँग्रेसचं जोरदार आंदोलन सुरू आहे. देशातली वाढती महागाई, बेरोजगारी याच्या विरोधात तसंच सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची ईडी चौकशी या सगळ्याच्या विरोधात ही निदर्शने होत आहेत. दरम्यान, मुंबईतही काँग्रेसची निदर्शने सुरू आहेत. नाना पटोले, बाळासाहेब थोरात यांच्यासह अनेक नेत्यांना पोलिसांनी रोखण्याचा प्रयत्न केला आहे.
काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांना पोलिसांच्या नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत. मुंबईतलं हे आंदोलन पोलिसांच्या मदतीने दडपण्याचा प्रयत्न सुरू आहे. अनेक कार्यकर्त्यांची धरपकडही सुरू केली आहे. काँग्रेस नेते संजय निरुपम तसंच माणिकराव ठाकरे यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
प्रदेशाध्यक्ष नाना पटोले , बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप ( यांच्यासह काँग्रेस नेते आंदोलनात सहभागी होत आहेत. राहुल गांधी यांचा राज्यात १६ दिवसांचा दौरा होतोय. सात लोकसभा मतदारसंघ व १५ विधानसभा मतदारसंघातून ते पदयात्रा काढणार असून त्या माध्यमातून ते थेट जनतेशी संवाद साधणार आहेत.
नुकतेच पोलिसांनी संजय निरुपम यांना ताब्यात घेतल्याचं वृत्त समोर आले आहे. काँग्रेस नेत्यांना त्यांच्या घरीच स्थानबद्ध करण्याचं पोलिसांचे नियोजन आहे.
मलबार हिलकडे जाणा-या रस्त्यांवर मुंबई पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे. राजभवनाकडे जाणा-या रस्त्यावरही पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त आहे. पोलिस प्रत्येक कार, टॅक्सी आणि बसच्या आतही तपासत आहेत, काँग्रेस कार्यकर्ते लपून आतमध्ये जात आहेत का हे पाहण्यासाठी ही तपासणी सुरू आहे.