श्रीनगर : काश्मिरी पंडित राहुल भट यांची हत्या घडवून आणणा-या दोन्ही अतिरेक्यांना भारतीय सुरक्षा दलांनी केवळ २४ तासांच्या आत शुक्रवार दि. १३ मे रोजी कंठस्नान घातले आहे.
गुरूवारी राहुल भट्ट यांची हत्या झाल्यानंतर देशभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या होत्या. राहुल भट यांच्या पत्नी मीनाक्षी यांनी पतीच्या ऑफिसमधील काही लोकांवर संशय व्यक्त करुन त्वरीत कारवाईची मागणी केली होती. सुरक्षा दळांनीही हल्लेखोरांचा दोन दिवसांत खात्मा करण्याचे आश्वासन मीनाक्षी भट यांना दिले होते. त्यानंतर सैन्यदल मोठ्या प्रमाणात अॅक्शन मोडमध्ये आले.
बडगाव, बांदीपोरा भागात मोठ्या प्रमाणात सर्च ऑपरेशन हातात घेऊन संपुर्ण परिसर पिंजून काढायला सुरुवात केली होती. अशातच शुक्रवारी बांदीपो-यात दहशतवादी लपल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी दहशतवादी लपलेल्या ठिकाणी दहशतवाद्यांबरोबर चकमक सुरु केली. चकमकीत ३ दहशतवाद्यांना यमसदनी धाडण्यात सुरक्षा दलांना यश आले. मारल्या गेलेल्या तीन दहशतवाद्यांमध्ये राहुल भट यांच्या मारेक-यांचाही खात्मा करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
सुरक्षा दलांनी दिलेल्या माहितीनूसार १० मे रोजी बांदीपोरा भागात तीन अज्ञात दहशतवाद्यांच्या हालचाली टिपण्यात आल्याचे अलर्टमध्ये म्हटले आहे. हे दहशतवादी सतत त्यांचे ठिकाण बदलत होते. बांदीपोरामध्ये १० मे पूर्वी ३० एप्रिललाही तीन दहशतवाद्यांचे लोकेशन ट्रॅक करण्यात आले होते. त्यापैकी दोन पाकिस्तानी दहशतवादी होते. दोन्ही पाकिस्तानी दहशतवादी उर्दू भाषिक आहेत. त्यांच्यासोबत एक स्थानिक दहशतवादीही होता. दोन पाकिस्तानी नागरिकांसोबत पकडलेला तिसरा दहशतवादी स्थानिक भाषा बोलत होता, असे सांगण्यात आले आहे.