मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात विविध विषय चर्चेत असतात. आता एका नव्या मुद्याने एन्ट्री केली आहे. ती म्हणजे ‘पोपट’. पोपट हा शब्द मागच्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. राजकीय नेते यावर प्रतिक्रिया देत आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नारायण राणे, उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत, भाजपचे नेते नितेश राणे यांनी या मुद्यावर भाष्य केले आहे.
१६ आमदारांच्या अपात्रतेवरून फडणवीस आणि ठाकरे गटात वार-पलटवार सुरू आहेत. याच अनुषंगाने पोपट हा शब्द वापरला जात आहे.
सर्वोच्च न्यायलयाच्या निर्णयानंतर फटाके वगैरे फोडण्याचे कारण अद्याप कळलेले नाही. असे म्हणतात की, त्यांना रेडा वगैरे या गोष्टी चांगल्या माहिती आहेत. असं मी ऐकलंय मी काही पाहिलेलं नाही. रेड्याला हारतुरे घातले जातात. त्यांनी फटाके वाजवले असतील तर माहिती नाही. सर्वोच्च न्यायालयाने पोपट हलत नाही, निश्चल आहे.. त्याने डोळे मिटलेले आहेत.. चोच उघडत नाही.. श्वासही घेत नाही, हे वर्णन करून पोपट मेलेला आहे हे जाहीर करण्याचे काम विधानसभा अध्यक्षांवर सोपवले आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
ठाकरेंना देवेंद्र फडणवीस यांचे उत्तर
१६ आमदारांच्या अपात्रतेचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांकडे सोपवलेले आहे. त्यांच्याकडे त्याची सुनावणी होणार आहे. या प्रकरणाबाबत विधानसभा अध्यक्ष निर्णय देतील. एक अभ्यासक म्हणून, एक वकील म्हणून आणि २५ वर्षे विधानसभेचा सदस्य म्हणून मला असं वाटतं की, उद्धव ठाकरे यांच्यासह महाविकास आघाडीला पुरतं माहिती आहे की, पोपट मेला आहे. तरी देखील ते पोपटावर बोलतायेत. मान हलवत नाही, वगैरे म्हणतात. पण आपल्या पक्षातील नेत्यांना खुश ठेवण्यासाठी उद्धव ठाकरे बोलतात. तो त्यांचा अधिकार आहे, असे म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरेंच्या टीकेला उत्तर दिले आहे.
संजय राऊत यांचे भाष्य
सर्वोच्च न्यायालयाने घडलेल्या प्रकारावर भाष्य केले आहे. शिंदे सरकारचा पोपट मेला आहे. ते केवळ जाहीर करणं बाकी आहे. मला असं वाटलेलं या शिंदे सरकारमध्ये एकमेव शहाणा माणूस आहे तो म्हणजे देवेंद्र फडणवीस. पण फडणवीसच असं बोलायला लागले असतील तर शहाणपणाच्या व्याख्या बदलाव्या लागतील, असे संजय राऊत म्हणाले.