वर्ध्यात झाडाखालीच रुग्णालय उभारलं
वर्धा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. त्यासोबत राज्यातही लॉकडाऊनसह जिल्हाबंदी करण्यात आली आहे. जिल्हाबंदी असूनही अनेकजण इतर जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात प्रवेश करत आहे. असाच प्रकार वर्धा जिल्ह्यातही होत आहे. तसेच वर्ध्यातील पुलगाव शहरातील रुग्णालयात उपचारासाठी अमरावती, यवतमाळ जिल्ह्यातील नागरिक मोठ्या प्रमाणात येत आहेत. त्यामुळे वर्धा जिल्ह्याच्या आरोग्य विभागाने जिल्ह्याच्या सीमेवर पुलगाव येथे ओ पी डी उभारली आहे.
वर्धा जिल्ह्याच्या सीमेवर निंबाच्या झाडाखाली उभारण्यात आलेल्या रुग्णालयात जिल्ह्याबाहेरून प्रवेश करणाऱ्या नागरिकांची आरोग्य तपासणी केली जात आहे. सकाळी 8 ते सायंकाळी 6 वाजेपर्यत चालणाऱ्या या ओ पी डीमध्ये तपासणी आणि औषधोपचार केले जात आहेत.
Read More हिंगोलीत मद्य शौकीनांची दिवाळी
पुलगाव येथील आरोग्य विभागाने हे रुग्णालय चेक पोस्टवर उभारले आहे. पुलगावचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. गोपाळ नारलवार यांच्या संकल्पनेतून हे रुग्णालय येथे ऊभारण्यात आले आहे. पुलगाव येथे यवतमाळ, अमरावती जिल्ह्याच्या सीमा लागून आहेत. याशिवाय मुंबई, पुणे, औरंगाबाद जिल्ह्यातील नागरिक देखील वर्ध्यात दाखल होत आहेत. त्यामुळे चेक पोस्टवर जिल्ह्याबाहेरून येणाऱ्या वाहनांना थांबवून त्यांची तपासणी करण्यात येत आहे.
दिवसात दोन शिफ्टमध्ये चालणारी ही ओपीडी कोरोना नियंत्रणासाठी फायदेशीर ठरते आहे. अमरावती आणि यवतमाळ जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे अनेकजण उपचारासाठी पुलगाव शहरातील रुग्णालयात येत आहे. उपचारासाठी अनेकजण येत असल्याने रुग्णालयात गर्दी होत आहे. यासाठी चेक पोस्टवर रुग्णालय उभारले आहे. त्यासोबत जे नागरिक कोरोना जिल्ह्यातून पुलगाव परिसरात वाहनांनी येत आहेत. त्यांची वाहने जिल्ह्याच्या सीमेवर थांबवली जात आहेत आणि त्यांना त्या वाहनांना परत पाठवले जात आहे.
एवढंच नव्हे तर या चेकपोस्टवरील रुग्णालयात मुंबई , पुणेसह कोरोनाबाधीत जिल्ह्यातून येणाऱ्या नागरिकांच्या वाहनांना आणि चालकाला सीमेवर ठेवण्यात येत आहे. या नागरिकांच्या नातेवाईकांना संपर्क साधत त्यांना वर्धा जिल्ह्याच्या वाहनाने घरी नेण्याचे सांगण्यात येत आहे आणि कोरोनाबाधित जिल्ह्यातील वाहनाला परत पाठवले जात आहे.