23.4 C
Latur
Thursday, March 23, 2023
Homeमहाराष्ट्रलंकेंच्या इच्छेवर संख्याबळाचे समीकरण : शरद पवार

लंकेंच्या इच्छेवर संख्याबळाचे समीकरण : शरद पवार

एकमत ऑनलाईन

नाशिक : पुण्यातील पोटनिवडणुकीच्या प्रचारात राष्ट्रवादीच्या स्टार प्रचारकांच्या यादीत आमदार लंके यांचा बड्या नेत्यांसोबत समावेश करण्यात आला आहे.

लंके यांनी पुण्यातील एका जाहीर सभेत बोलताना राष्ट्रवादीचे नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांना मुख्यमंत्री करायचे असल्याने कार्यकर्त्यांनी कामाला लागावे, असे म्हटले होते. खुद्द अजित पवार यांच्या उपस्थितीत लंके यांनी केलेल्या या विधानाची मोठी चर्चा सुरू झाली आहे. यावर पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी नाशिकमध्ये बोलताना प्रतिक्रिया दिली आहे. लंके यांच्या विधानाशी सहमती अगर नापसंतीही व्यक्त न करता केवळ संख्याबळाचे समीकरण पवार यांनी समोर ठेवले.

आमदार लंके यांच्या या विधानासंबंधी विचारले असता शरद पवार म्हणाले की, ‘कोणाला काहीही आवडू शकते. मात्र, तुमचे तेवढे संख्याबळ असले पाहिजे ना? जर राष्ट्रवादी काँग्रेस राज्यात क्रमांक एकचा पक्ष असता तर सर्व सहका-यांना विश्वासात घेऊन आम्ही निर्णय घेतले असते. मात्र, आज आमच्याकडे संख्याबळ नाही. त्यामुळे सध्या तरी यावर भाष्य करणे मला योग्य वाटत नाही’, असे सांगत पवार यांनी हा विषय संपवला.

आमदार लंके जसे शरद पवार यांच्या जवळचे आहेत, तसेच ते अजित पवारांच्याही जवळचे आहेत. आगामी निवडणुकीत अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात आहे. त्यासाठी स्वत: पवार त्यांना शक्य होईल तशी ताकद लंके यांना देतात. नगर जिल्ह्यातच नव्हे तर इतरही ठिकाणी त्यांना दौ-यात सोबत घेताना दिसतात. अलीकडेच त्यांची पुण्यातील पोटनिवडणुकीसाठी स्टार प्रचारक म्हणून नियुक्ती झाली आहे. त्यानंतर पुण्यातील एका कार्यक्रमात बोलताना लंके यांनी हे विधान केले होते.

कार्यकर्त्यांना उद्देशून निलेश लंके म्हणाले होते, येणा-या निवडणुकीत आपल्याला अजित पवारांना मुख्यमंत्री करायचे आहे. त्यांना फक्त पाच वर्षे मुख्यमंत्रिपदाची संधी मिळाली तरी आपले राज्य २५ वर्षे पुढे गेल्याशिवाय राहणार नाही, अशी माझी खात्री आहे. मात्र, हे फक्त भाषणातून बोलायचे नाही. येत्या वर्षभरात अजितदादांच्या कामाची पद्धत घराघरांत पोहोचवून पुढच्या वर्षी आपल्याला निवडणुकीला सामोरे जायचे आहे, असे लंके म्हणाले होते. त्यावरून या विषयाची चर्चा सुरू झाली आहे.

दरम्यान, निलेश लंके यांच्या याच विधानावरून नाशिकमध्ये शरद पवार यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला होता. एका बाजूला लाडक्या आमदाराचे विधान तर दुसरीकडे ते विधान अजित पवार यांच्याबद्दलचे अशी परिस्थिती असताना शरद पवारांनी आपल्या स्टाईलमध्ये याचे उत्तर देत प्रश्न संपवला.

Stay Connected

1,567FansLike
183FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या