23.2 C
Latur
Sunday, June 26, 2022
Homeराष्ट्रीय८ वर्षांत इथेनॉल उत्पादनात दुपटीने वाढ

८ वर्षांत इथेनॉल उत्पादनात दुपटीने वाढ

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : अतिरिक्त साखरेच्या समस्येवर कायमस्वरुपी तोडगा काढण्यासाठी सरकार साखर कारखान्यांना अतिरिक्त ऊस इथेनॉल निर्मितीकडे वळविण्यासाठी प्रोत्साहन देत आहे. कृषी अर्थव्यवस्थेला चालना देणे, आयातीत जीवाश्म इंधनावरील अवलंबित्व कमी करणे, कच्च्या तेलाच्या आयात बिलामुळे परकीय चलनाची बचत करणे आणि वायू प्रदूषण कमी करणे यासाठी सरकार प्रयत्न करीत आहे. दरम्यान, गेल्या ८ वर्षात इथेनॉल उत्पादन क्षमतेत दुपटीने म्हणजेच ४२१ कोटी लीटरवरुन ८६७ कोटी लीटरपर्यंत वाढ झाली आहे.

सन २०१४ पर्यंत, मोलॅसिस-आधारित डिस्टिलरीजची इथेनॉल डिस्टिलेशन क्षमता केवळ २१५ कोटी लिटर होती. मात्र, गेल्या ८ वर्षांत सरकारने केलेल्या धोरणात्मक बदलांमुळे, मोलॅसिस-आधारित डिस्टिलरीजची क्षमता ५६९ कोटी लिटरपर्यंत वाढली आहे. २०१४ मध्ये २०६ कोटी लीटर असलेली धान्य-आधारित डिस्टिलरीजची क्षमता वाढून २९८ कोटी लीटर झाली आहे. अशा प्रकारे, एकूण इथेनॉल उत्पादन क्षमता केवळ ८ वर्षांत ४२१ कोटी लीटरवरुन ८६७ कोटी लीटरपर्यंत वाढली आहे.

मका, तांदळापासून निर्मितीला प्रोत्साहन
इंधन म्हणून वापरता येण्याजोग्या इथेनॉलची निर्मिती वाढवण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. यासाठी भारतीय अन्न महामंडळाकडे उपलब्ध असलेल्या मका आणि तांदळापासून इथेनॉल निर्मिती करणा-या कारखान्यांना प्रोत्साहन देत आहे. सरकारने भारतीय अन्न महामंडळाकडे उपलब्ध असलेल्या मका आणि तांदळापासून तयार केलेल्या इथेनॉलचीकिंमतही निश्चित केली आहे. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सरकार साखर कारखाने आणि डिस्टिलरीजना त्यांची गाळप क्षमता वाढवण्यासाठी प्रोत्साहन म्हणून बँकेच्­या कर्जावर ६ टक्के अनुदान किंवा बँकेच्या व्याजावर ५० टक्के सूट यापैकी जे कमी असेल तो भार सरकार उचलणार आहे. यामुळे सुमारे ४१ कोटी रुपयांची गुंतवणूक होईल.

अतिरिक्त ऊसाचा प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न
खाद्य आणि सार्वजनिक वितरण विभागाने सहा महिन्यांसाठी एक कक्ष सुरू केला असून हा कक्ष २२ मे २०२२ असून कार्यरत होणार आहे. या कक्षाद्वारे तांदूळ, गहू, बार्ली, मका, ज्वारी यासारख्या पिकांपासून तसेच ऊस, साखर, काकवी, बी-मोलॅसिस, आणि सी- मोलॅसिस यापासून प्रथम दर्जाचे इथेनॉल तयार करणा-या जुन्या कारखान्यांकडून त्यांचे उत्पादन वाढवण्यासाठी तसेच नव्याने उत्पादन सुरू करणा-या कारखान्यांकडून अर्ज मागविले जाणार आहेत.

सन २०२५ निर्मिती आणखी वाढणार
या सारख्या उपाययोजनांमुळे २०२५ पर्यंत देशाची इथेनॉल निर्मिती क्षमता दुपटीने वाढून निर्धारित उद्दिष्टांची २० टक्के साध्यता असेल. यामुळे अतिरिक्त ऊसाचा प्रश्न सुटेल आणि ऊस उत्पादक शेतक-यांना वेळेवर परतावा मिळेल. गेल्या काही वर्षात सरकारने अमलात आणलेल्या उपायांमुळे साखर कारखान्यांची मूळ आर्थिक स्थिती आणि तरलता वाढली आहे. साखर कारखाने स्वावलंबी झाले आहेत. मागच्या काही वर्षात साखर कारखान्यांच्या समभागांच्या किमतीमध्ये ४ ते ५ पटीत वाढ झाली आहे हे कारखान्यांच्या प्रगतीचे द्योतक आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या