23.8 C
Latur
Tuesday, September 27, 2022
Homeमहाराष्ट्रशिंदे गटाकडून सेनेचा ‘दसरा मेळावा’ हायजॅक?

शिंदे गटाकडून सेनेचा ‘दसरा मेळावा’ हायजॅक?

एकमत ऑनलाईन

 अर्ज दाखल करूनही शिवसेनेला अद्याप परवानगी नाही
मुंबई : शिंदे गटाकडून शिवसेनेचा ‘दसरा मेळावा’ हायजॅक करण्याची तयारी सुरू झाल्याची माहिती मिळत आहे. उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात जोरदार रस्सीखेच सुरू झाली आहे. मुंबई महापालिकेकडून मेळाव्याला परवानगी मिळावी यासाठी शिवसेनेने अर्ज दाखल केला असताना, महापालिकेने मात्र हात आखडता घेतल्याची माहिती मिळत आहे.

शिवसेनेचे प्रबळ नेते एकनाथ शिंदे यांनी काही आमदारांसह बंड केले आणि शिवसेनेत उभी फूट पडली. एकापाठोपाठ एक आमदार, खासदार, नगरसेवक शिंदे गटात सहभागी झाले. त्यानंतर आमचीच खरी शिवसेना हा दावा शिंदे गटाकडून केला जाऊ लागला. राज्याच्या राजकारणातील सर्वांत मोठ्या बंडाने अख्खा महाराष्ट्र हादरला. शिंदे गटाकडून दिवसागणिक नवनवे दावे होऊ लागले.

काहीच दिवसांत हा वाद सर्वोच्च न्यायालयात पोहोचला. महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. अशातच आता शिवसेनेसाठी महत्त्वाचा असलेला दसरा मेळावाच हिसकावण्याचा शिंदे गटाचा प्रयत्न असल्याची माहिती मिळत आहे.

शिवसेनेच्या ५०व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित एका कार्यक्रमादरम्यान बोलताना उद्धव ठाकरे यांनी यंदाचा दसरा मेळावा जाहीरपणे शिवतीर्थावरच घेणार, असा विश्वास शिवसैनिकांना दिला होता. गेल्या दोन वर्षांत दसरा मेळाव्याचे जाहीर आयोजन करण्यात आले नव्हते.

गेल्या वर्षी तर काही प्रमुख पदाधिका-यांच्या उपस्थितीत शिवसेनेचा दसरा मेळावा पार पडला होता. सध्या राज्यात कोरोनावरील निर्बंध उठवले असून सर्व सण-उत्सव, राजकीय कार्यक्रमांवरील निर्बंध उठवण्यात आले आहेत. त्यामुळे यंदा शिवतीर्थावर दसरा मेळावा घेण्यात येणार असल्याचे उद्धव ठाकरेंनी जाहीर केले आहे.

दसरा मेळाव्याला परवानगी मिळवण्यासाठी शिवसेनेकडून मुंबई महानगरपालिकेकडे अर्ज करण्यात आला आहे. पण अद्याप शिवसेनेला कोणतीही परवानगी देण्यात आली नसल्याची माहिती मिळत आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या