मुंबई : विधानसभेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी सर्वच पक्षांचे आमदार विधानभवनात दाखल झाले. दरम्यान, शिवसेना आमदार आदित्य ठाकरे हेही त्यांच्यासोबत असलेल्या शिवसेना आमदारांसोबत दाखल झाले आहेत. त्यावेळी त्यांनी शिंदे गटासह भाजपावरही टीका केली. तसेच विधानभवन परिसरातल्या सुरक्षेवर टीका केली.
विधानभवनाबाहेरच आदित्य ठाकरेंनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शिवसेनेच्या व्हीपबद्दलही माहिती दिली. सुनील प्रभूंनी जारी केलेला व्हीप हाच अधिकृत आहे आणि तोच महत्त्वाचा आहे, असेही त्यांनी पुन्हा एकदा सांगितले. तसेच त्यांनी विधानभवन परिसरातल्या सुरक्षेवरही टीका केली आहे.
आदित्य ठाकरे म्हणाले की, विधानभवनात सुरक्षा जास्तच कडक करण्यात आली आहे. माध्यमं आणि आमदारांमध्ये दोरी बांधण्यात आली आहे. ही दोरी कधीच नव्हती. एवढी कसली भीती आहे? आता तुम्ही त्यांनाही पळवणार आहात आणि गुवाहाटीला नेणार आहात की आम्ही काही करणार आहोत?
सरकारचा एवढा बंदोबस्त असताना, आमदारांना कोणताही धोका नसताना एवढा बंदोबस्त कशाला? कसाबच्या वेळीही एवढा बंदोबस्त नव्हता किंवा एरवी कधीच मुंबईत एवढा बंदोबस्त नव्हता.