22.4 C
Latur
Thursday, September 29, 2022
Homeमहाराष्ट्रपशुधनाच्या औषधांचा खर्च शासन करणार

पशुधनाच्या औषधांचा खर्च शासन करणार

एकमत ऑनलाईन

पुणे : देशातील विविध राज्यांत लम्पी स्कीन या आजाराचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे देशातील पशुपालक सध्या चिंतेत आहे. महाराष्ट्रातही जवळपास २२ जिल्ह्यांत लम्पी स्कीन या आजाराचा जनावरांवर प्रादुर्भाव झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर प्रशासन सतर्क झाले आहे. राज्यात लम्पी रोगावर नियंत्रणासाठी मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहीम राबवण्यात येत आहे.

लम्पी बाधित पशुधनावरील औषधांचा सर्व खर्च शासनातर्फे करण्यात येईल, तसेच जिल्हास्तरावर उपचारासाठी आवश्यक औषधांची ‘ड्रग्ज बँक’ देण्यात येणार असल्याचे मत राज्याचे पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केले. तसेच एका दिवसात एक लाख पशुधनाचे लसीकरण करण्यात येत असल्याचे विखे पाटील म्हणाले.

पशुसंवर्धन आयुक्तालयात आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय आढावा बैठकीत विखे पाटील बोलत होते. या बैठकीला पशुसंवर्धन विभागाचे प्रधान सचिव जे. पी. गुप्ता, पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह, पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, अतिरिक्त आयुक्त पशुसंवर्धन डॉ. डी. डी परकाळे उपस्थित होते. राज्यासाठी एका आठवड्यात ५० लाख लसमात्रा उपलब्ध होणार आहेत.

लसीकरणासाठी खासगी पशुवैद्यक आणि पशुवैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांची मदत घेण्यात यावी असे देखील विखे पाटील यावेळी म्हणाले. खासगी पशुवैद्यकांना आवश्यक सुविधा देण्यात याव्यात. विद्यार्थ्यांना निवास व अनुषंगिक व्यवस्था आणि प्रति लसीकरण तीन रुपये प्रमाणे मानधन सुरू करावे. जिल्हा परिषदेतील वरिष्ठ अधिका-यांनी गाव पातळीवर भेटी देऊन लम्पी चर्म आजाराबाबत गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करावा असेही विखे पाटील यावेळी म्हणाले.

केंद्र सरकारकडे पाठपुरावा करणार
राज्य शासनाने वेळेत उपाययोजना केल्याने हा आजार नियंत्रणात असल्याचे विखे पाटील म्हणाले. जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद आणि पशुसंवर्धन विभागाच्या एकत्रित प्रयत्नातून लसीकरणाचा वेग वाढवण्यात आल्याने देशातील अन्य राज्यांच्या तुलनेत या आजाराचा प्रादुर्भाव कमी करण्यात यश आले आहे. आजारावर पूर्ण नियंत्रण मिळवण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करून पाच किलोमीटर परिसरातील पशुधनासोबतच राज्यभरातील पशुधनाचे लसीकरण करण्याचा प्रयत्न आहे. एका दिवसात एक लाख पशुधनाचे लसीकरण करण्यात येत असून, येत्या काळात हा वेग अधिक वाढेल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या