नवी दिल्ली : फेसबुकच्या मूळ कंपनीतील नंबर दोन अधिका-याने राजीनामा दिला आहे. कंपनीची चीफ ऑपरेटिंग ऑफिसर शेरिल सँडबर्ग १४ वर्षे फेसबुकशी संबंधित होती. स्टार्टअपपासून फेसबुकला एक मोठी सोशल मीडिया कंपनी बनवण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता.
मात्र, कंपनीच्या काही चुकीच्या निर्णयांवरही त्यांच्याकडे बोट दाखवण्यात आले होते. ती २००८ मध्ये कंपनीत सामील झाली होती. फेसबुक सार्वजनिक होण्याच्या चार वर्षांपूर्वी आणि कंपनीचे सीईओ मार्क झुकेरबर्ग नंतर सर्वांत जास्त चर्चेत असलेला चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात होते. फेसबुकपूर्वी सँडबर्ग यांनी गुगलमध्येही काम केले आहे. त्यांच्या जागी जावियर ऑलिव्हन यांची फेसबुकचे नवे सीओओ म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
शेरिलने तिच्या फेसबुक पोस्टमध्ये लिहिलेय, मी जेव्हा २००८ मध्ये कंपनीत रुजू झाले, तेव्हा मला वाटलं नव्हतं की इतकी वर्षे कंपनीत काम करेन. आता आयुष्याचा नवा अध्याय लिहिण्याची वेळ आलीय. मला भविष्यात समाजासाठी काम करायचं आहे. सोशल मीडियाचा संदर्भ देत त्या म्हणाल्या, यात आता पूर्वीपेक्षा खूप बदल झालाय. आम्ही बनवलेल्या उत्पादनांचा लोकांवर मोठा प्रभाव पडत आहे. लोकांची गोपनीयता राखणं ही आपली जबाबदारी आहे, त्यामुळे लोकांचं कोणतंही नुकसान होणार नाही.