16.8 C
Latur
Thursday, December 1, 2022
Homeमहाराष्ट्रभंडा-यात फडणवीस आणि पटोले यांची बंद दाराआड भेट

भंडा-यात फडणवीस आणि पटोले यांची बंद दाराआड भेट

एकमत ऑनलाईन

भंडारा : भंडारा जिल्ह्यात काल ३ ऑक्टोबर रोजी अवघ्या काही मिनिटांची मात्र राजकीय दृष्टिकोनातून अनेकांच्या भुवया उंचावणारी एक घटना घडली. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची काल भेट झाली. बंद दाराआड देवेंद्र फडणवीस आणि नाना पटोले यांच्यात पाच मिनिटं खलबतं झाली. या बैठकीचा तपशील कळू शकलेला नाही. परंतु या भेटीची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे.

भंडारा जिल्हा नियोजन समितीची बैठक काल भंडा-याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात पार पडली. फडणवीस पालकमंत्री म्हणून पहिल्यांदाच बैठकीला आले होते. या बैठकीसाठी भंडारा जिल्ह्यातून आमदार आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले काहीसा उशिरा पोहोचले. बैठकीमध्ये नाना पटोले यांनी प्रशासनाच्या कारभारावर प्रश्न उपस्थित केले. त्याला अधिकारी आणि देवेंद्र फडणवीस यांनी देखील उत्तरं दिली. सुमारे पावणे दोन तास चाललेल्या बैठकीनंतर देवेंद्र फडणवीस पत्रकार परिषद घेणार होते.

मात्र बैठक आणि पत्रकार परिषदेदरम्यानच्या पाच-सात मिनिटांच्या कालावधीत देवेंद्र फडणवीस आणि नाना पटोले यांची अवघ्या काही मिनिटांसाठी नियोजन अधिका-याच्या चेंबरमध्ये भेट झाली. यावेळी फडणवीस यांनी त्यांच्यासोबतचे राजकीय कार्यकर्ते आणि त्यांच्या सुरक्षा पथकाला बाहेर ठेवले होते. सुमारे पाच मिनिटे भेट घेतल्यानंतर फडणवीस लगेच पुन्हा हॉलमध्ये पत्रकार परिषद घेण्यासाठी पोहोचले.

फडणवीस-पटोले भेटीची चर्चा
बैठकीमध्ये फडणवीस आणि पटोले यांच्यामध्ये काय चर्चा झाली हे स्पष्ट होऊ शकलेले नाही. नाना पटोले यांनी जेव्हा भाजप सोडली होती तेव्हा त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली होती. त्यानंतरही ते सातत्याने फडणवीस यांच्यावर टीका करत राहिले. मात्र जेव्हा पालकमंत्री म्हणून फडणवीस हे पटोले यांच्या भंडारा जिल्ह्यात आले तेव्हा पटोले यांनी भेट घेत काय चर्चा केली यासंदर्भात आता चर्चा रंगू लागल्या आहेत.

भेटीत स्थानिक प्रश्नांवर चर्चा झाल्याची शक्यता
भेटीमागचे कारण काय हे समजू शकलेले नाही. स्थानिक कार्यकर्त्यांच्या म्हणण्यानुसार, भंडारा जिल्ह्यातील स्थानिक प्रश्न आहेत, त्याबाबत नाना पटोले यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा केली. एकमेकांचे विरोधक असणारे नेते भेटतात आणि बंद दाराआड त्यांच्याच चर्चा होते. त्यामुळे राजकीय विश्वात या भेटीमुळे भुवया उंचावल्याशिवाय राहणार नाहीत.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या