27.4 C
Latur
Tuesday, September 27, 2022
Homeमहाराष्ट्रफडणवीसांचा रशियाहून पोलिस महासंचालकांना फोन , साधू मारहाण प्रकरणाचा अहवाल मागवला

फडणवीसांचा रशियाहून पोलिस महासंचालकांना फोन , साधू मारहाण प्रकरणाचा अहवाल मागवला

एकमत ऑनलाईन

मुंबई : महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यात साधूंना झालेल्या मारहाण प्रकरणाचे पडसाद देशभरात उमटत आहेत. आता या प्रकरणी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे पोलिस महासंचालक रजनीश सेठ यांना रशियावरून फोन केला आणि साधू मारहाण प्रकरणी सविस्तर अहवाल मागितला आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी फोनवरून पोलिस महासंचालकांशी या मारहाण प्रकरणी चर्चा केली, माहिती घेतली. हे गंभीर प्रकरण असून तुम्ही स्वत: या प्रकरणाकडे लक्ष द्या, तपास कसा सुरू आहे, मारहाण करणारे कोण होते, व्हीडीओ व्हायरल कसा झाला याचा संपूर्ण अहवाल द्या, अशा सूचना फडणवीसांनी दिल्या. देवेंद्र फडणवीस रशियावरून परतल्यानंतर पोलिस महासंचालकांकडून सविस्तर माहिती घेतील.

पंढरपूर येथे देवदर्शनासाठी जाणा-या चार साधूंना जत तालुक्यातील महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर असलेल्या लवंगा परिसरातील ग्रामस्थांनी बेदम मारहाण केली होती. मुले चोरणारी टोळी असल्याच्या संशयावरून ही मारहाण झाली होती. चार चाकी गाडीतून ओढून रस्त्यावर लाथा-बुक्क्यांनी कातडी पट्ट्याने मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली. एकूण २५ जणांवर या प्रकरणात गुन्हा दाखल असून, अन्य आरोपींचा शोध सुरू आहे.

अटकेत असलेले आमसिद्धा तुकाराम सरगर आणि लहु रकमी लोखंडे, हे दोघे काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत. आमसिद्धा तुकाराम सरगर हा लवंगा गावच्या काँग्रेसच्या सरपंच बायक्का तुकाराम सरगर यांचा मुलगा आहे आणि लहू रकमी लोखंडे हा माजी सरपंच आहे. सागर शिवाजी तांबे, रमेश सुरेश कोळी, सचिन बसगोंडा बिराजदार व शिवाजी सिधराम सरगर अशी अटकेतील अन्य लोकांची नावे आहेत.

सांगली पोलिस चार साधूंच्या संपर्कात
मारहाण झालेल्या साधूंचे जबाब पुन्हा सांगली पोलिस घेण्याच्या तयारीत आहेत. सांगली पोलिस या चार साधूंच्या संपर्कात देखील आहेत. काल या मारहाणीचे गांभीर्य समोर आल्यानंतर पोलिसांनी तक्रार दाखल करत गुन्हा दाखल केला. त्यापैकी काही आरोपींना अटक केल्याने पोलिस आता साधूंचे जबाब नोंदवणार आहेत.

मारहाण झालेल्या दिवशी साधूंनी मारहाणीबाबत कोणतीही तक्रार नसल्याचे जबाबामध्ये म्हटल्याचे पोलिसांनी सांगितले. मारहाण झालेले चार साधू सध्या कुठे आहेत? त्यांचे लोकेशन काय हे मात्र गुप्त ठेवण्याचा पोलिसांचा प्रयत्न आहे. दरम्यान साधूंना मारहाण करणा-या सात आरोपींना आज दुपारी जत न्यायालयात हजर केले जाणार आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या