नागपूर : नागपुरात देवेंद्र फडणवीस यांच्या तोंडावर चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले की, ‘आमचे पुढील मुख्यमंत्री तुम्हीच’. याचा अर्थ स्पष्टच की, मिंधे सरकारच्या पायाखालची सतरंजी ओढली जात आहे, असा दावा शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला आहे. भाजप व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राज्य सरकार व एकनाथ शिंदे यांच्या बाजूने लढत असल्याचा नुसता आव आणीत आहेत, असा आरोपही उद्धव ठाकरे यांनी केला आहे.
आजच्या ‘सामना’च्या अग्रलेखात उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे की, बावनकुळे हे शंभर टक्के फडणवीसनिष्ठ आहेत व फडणवीस यांना हवी तीच भूमिका ते घेतात. मग इतके मोठे विधान फडणवीस यांच्या मंजुरीशिवाय ते करतील काय? हाच प्रश्न आहे. नागपुरातील थंडीत राजकीय शेकोटीचा मिंधे गटाच्या पाठीला चटका बसला आहे. फेब्रुवारीपर्यंत बरेच काही घडेल. महाराष्ट्रातील औटघटकेची व्यवस्था डामाडौल आहे. बावनकुळे यांनी तसा फटाकाच फोडला आहे. भाजपच्या मनावरील दगड दूर करण्याचे काम सुरू झाले आहे
देवेंद्र फडणवीसांच्या मनातील इच्छा
उद्धव ठाकरे म्हणाले, भारतीय जनता पक्षाच्या मनातली वेदना अचानक उसळून ओठावर येते. ‘मी प्रदेश अध्यक्ष असेपर्यंत देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत,’ अशी इच्छा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केली आहे. चंद्रशेखर बावनकुळे हे देवेंद्र फडणवीस पुरस्कृत पक्षाध्यक्ष आहेत. इतके मोठे विधान बावनकुळे स्वत:च्या मनमर्जीने करणार नाहीत. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्या मनातली इच्छा चंद्रशेखर बावनकुळेंच्या मुखातून बाहेर पडली, असे मानायला जागा आहे.