मुंबई : मागील काही दिवसांपासून राज्याच्या राजकीय वर्तुळात अनेक घडामोडी घडल्या आहेत. विधान परिषदेचा निकाल लागल्यानंतर राज्यात सत्तानाट्याला सुरुवात झाली. दरम्यान, काल एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. मात्र आता मुख्यमंत्रीपद न मिळाल्याने देवेंद्र फडणवीस हे नाराज असल्याची चर्चा सुरू आहे.
उपमुख्यमंत्री म्हणून वर्णी लागल्याने फडणवीस नाराज असल्याच्या प्रतिक्रियाही आल्या होत्या. हीच नाराजी उघड करणारी एक मोठी बातमी समोर आली आहे. एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाल्यानंतर मुंबईत भाजपकडून जल्लोष साजरा केला. जल्लोषासाठी ठिकठिकाणी बॅनर लावण्यात आले आहेत. मात्र देवेंद्र फडणवीस यांच्या बॅनरवर भाजपचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा फोटो लागलेला नाही, त्यामुळे फडणवीस अमित शाह यांच्यावर नाराज आहेत का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
पदभारामुळे नाखुश
शपथविधीआधी झालेल्या पत्रकार परिषदेत आपण सरकारच्या मंत्रिमंडळात सहभागी होणार नसल्याचे फडणवीसांनी जाहीर केले होते. त्यानंतर पंतप्रधान मोदींसह अमित शाह, जे.पी नड्डा यांनी ट्विट करत फडणवीसांना उपमुख्यमंत्रपदी विराजमान होण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर त्यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. मात्र या पदभारामुळे ते खूश नाहीत, अशी चर्चाही रंगू लागली आहे.
चर्चेला उधाण
काल, गुरूवारी एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यानंतर महाराष्ट्रातील सर्व राजकीय नेत्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. फडणवीस हे मुख्यमंत्रीपदाचे दावेदार असतानाही त्यांनी उपमुख्यमंत्रपद का घेतले? वरिष्ठांच्या आदेशानंतरच फडणीसांना हा निर्णय घेणे भाग पडले का? अशी चर्चा सुरू झाली आहे.