मुंबई : माझ्यावर आरोप करणा-या महिलेच्या कुटुंबाची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे. पैशांसाठी मला तिने ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केल्याचे वक्तव्य शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी केले. माझ्या पक्षातील लोकच त्या महिलेला संपर्क करून मला बदनाम करण्याचा प्रयत्न करत होते, असा आरोप शेवाळेंनी केला आहे. दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी मला या प्रकरणी मदत केली असल्याचे शेवाळेंनी सांगितले. त्या महिलेला कोरोनाच्या काळात मी मदत केली असल्याचा खुलासाही त्यांनी केला.
त्यानंतर त्या महिलेने मला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केल्याचे शेवाळेंनी सांगितले. याप्रकरणाची एनआयएकडून चौकशी करण्यात यावी, अशी मागणी यावेळी शेवाळेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली.
युवासेनेच्या पदाधिका-यांसह राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी चुकीची माहिती पसरवली. सदरची महिला दुबईची आहे. पाकिस्तानी एजंटच्या मदतीने संबंधित महिलेने फेक अकाऊंट चालवले होते. माझ्या पत्नीला वारंवार धमक्या आल्या असल्याचेही शेवाळे म्हणाले. ही महिला खोट्या तक्रारी करत असल्याची माहिती मी उद्धव ठाकरे यांना दिली होती.
त्यानंतर उद्धव ठाकरेंनी याबाबत लक्ष घालण्यास तत्कालीन मंत्री अनिल परब यांना सांगितले होते. याप्रकरणी मला उद्धव ठाकरेंनी मदत केल्याचे शेवाळेंनी सांगितले. शिवसेना सोडल्यानंतर युवा सेनेचे पदाधिकारी आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी माझ्याबद्दल चुकीची माहिती पसरवली आहे. युवा सेनाप्रमुखांमुळेच या गोष्टी घडल्या असल्याचे म्हणत शेवाळेंनी आदित्य ठाकरेंवर टीका केली. या महिलेला युवा सेनेचे पदाधिकारी फॉलो करत असल्याचेही शेवाळे म्हणाले.
सदर महिला दाऊद गँगशी संबंधित
सदर महिलेचा पाकिस्तानी ग्रुप आहे. ही महिला दाऊद गँगशी संबंधित असल्याचेही शेवाळे म्हणाले. हे प्रकरण साधेसुधे नसून दाऊद गँगशी संबंधित आहे. त्यामुळे या प्रकरणाची एनआयएच्या माध्यमातून चौकशी करण्यात यावी अशी मागणी शेवाळे यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे केली. जर मी दोषी असतो तर त्याचवेळी कारवाई झाली असती असेही शेवाळेंनी सांगितले. संबंधित महिलेला युवा सेनाप्रमुख पाठिशी घालत असल्याचे शेवाळे म्हणाले.
ठाकरे गट आणि राष्ट्रवादीकडून माझी बदनामी
माझ्या तक्रारीनंतर सदर महिला दुबईच्या तुरुंगात गेली असल्याचे शेवाळेंनी सांगितले. आरोप करणारी महिला बार डान्सर आहे. या महिलेला ठाकरे गटातील नेत्यांची फूस आहे. मी शिवसेनेत बंड केल्यानंतर ठाकरे गट आणि राष्ट्रवादीकडून माझी बदनामी सुरू असल्याचे शेवाळेंनी सांगितले.