जिराईत २०, बागायत १० गुंठे जमीन खरेदी करण्यास मुभा
मुंबई : राज्य सरकारकडून तुकडे बंदी कायदा लागू करण्यात आला होता. यामुळे शेतक-यांना तुकड्याने शेती विकता येत नव्हती. दरम्यान सरकारकडून हा निर्णय बदलण्यात आला आहे. यामुळे शेतक-यांना आता तुकड्याने शेती विकता येणार आहे. शेतीसाठी निश्चित असलेले प्रमाणभूत क्षेत्र कमी करण्यात आले आहे. त्यानुसार जिराईत जमीन २० गुंठे आणि बागायत जमीन १० गुंठे खरेदी करता येणार आहे. या निर्णयावर नागरिकांनी हरकती व सूचना पाठवाव्यात, असे आवाहन महसूल विभागाने केले आहे.
राज्यात महसूलचे ६ विभाग आहेत. प्रत्येक विभागात तालुकानिहाय त्यासाठी प्रमाणभूत क्षेत्र निश्चित करण्यात आले आहे. त्या खालील क्षेत्राचे तुकडे पाडून विक्री केल्यास त्यांची दस्त नोंदणी होत नाही. परंतु गेल्या काही वर्षात बेकायदेशीरपणे शेतीचे तुकडे पाडून मोठ्या प्रमाणावर विक्री करण्यात आली आहे. तसेच या कायद्याचे सर्रासपणे उल्लंघन करण्याचे काम होत आहे. यापूर्वी अशा प्रकारे झालेले व्यवहार आणि भविष्यात अशा प्रकारांना आळा बसावा, यासाठी तुकडाबंदी कायद्यात दुरुस्ती करण्याबाबत राज्य सरकारच्या पातळीवर विचार सुरू होता.
त्यानुसार राज्य शासनाने हा मसुदा तयार केला आहे. सध्या प्रत्येक विभागात शेतजमिनींसाठी प्रमाणभूत क्षेत्र हे वेगवेगळे आहे. ते यानिमित्ताने एकसमान करण्यात आले आहे. या अधिसूचनेवर नागरिकांनी अप्पर मुख्य सचिव (महसूल), मंत्रालय शेतजमीन मालक आणि खरेदीदार मुंबई ४०००३२ यांच्याकडे या हरकती पाठवाव्यात, असे आवाहन महसूल विभागाने केले आहे.