माजी खा. राजू शेट्टी यांचा राज्य सरकारला इशारा
शिरोळ : केंद्र व राज्य सरकारने शेतकरी प्रश्नावर ठोस भूमिका घेतली पाहिजे. वीज तोडणी, ऊस तोडणी मुकादमकडून होणारी फसवणूक थांबवावी, एकरकमी एफआरपी, शेतक-यांना दिवसा वीज द्या, किमान हमीभावाचा कायदा लागू करा, पिकविमा तातडीने खात्यावर जमा करा, नियमित कर्ज भरणा-या शेतक-यांना ५० हजार रुपये दिले पाहिजेत. हे निर्णय झाले नाही तर येत्या अधिवेशनामध्ये विधानसभेला धडक दिल्याशिवाय राहणार नसल्याचा इशारा स्वाभिमानीचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी सरकारला दिला.
उदगाव (ता. शिरोळ) येथील सांगली-कोल्हापूर महामार्गावरच्या चेकनाक्यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली चक्का जाम आंदोलन करण्यात आले. यावेळी राजू शेट्टी यांनी सरकारला इशारा दिला. यावेळी शेट्टी पुढे म्हणाले की, महाराष्ट्रात सध्या राजकीय धुळवड सुरू आहे. यात शेतक-यांचे प्रश्न बाजूला राहिले आहेत. जे सत्तेत आहेत ते मजेत आहेत. जे विरोधात आहेत, ते शेतक-यांच्या प्रश्नाकडे लक्ष द्यायला तयार नाहीत. त्यामुळे शेतक-यांनी जगायचे कसे असा प्रश्न पडला आहे.
अडचणीत असलेल्या शेतक-याला तुटपूंजी मदत जाहीर केली आणि तीही वेळेवर मिळत नाही. पीक विमा कंपन्या मालामाल झाल्या. हजारो कोटींचा नफा मिळवला आणि ज्या शेतक-यांनी विम्याचे पैसे भरले आहेत, त्यांना मात्र उन्हातान्हात उभे राहण्याची वेळ आली आहे. त्यामुळे पंतप्रधान पीक विमा योजना शेतक-यांसाठी आहे की कार्पोरेट कंपन्यांना डल्ला मारण्यासाठी, प्रधानमंत्री कार्पोरेट कल्याण योजना आहे असा सवाल उपस्थित केला.
शेतक-यांना फसवले
एकनाथ शिंदे सरकार सत्तेवर आले आणि महाराष्ट्र शेतकरी आत्महत्या मुक्त राज्य अशी घोषणा केली. परंतु शेतक-यांच्या आत्महत्या थांबायला तयार नाहीत. सध्या उन्हाळा सुरुवात झाला आहे. विहिरीत व बोरमध्ये पाणी आहे मात्र विजेची कनेक्शन तोडणी जात असल्याने पीके वाळत आहेत. एकूणच शेतक-यांची फसवणूक होत आहे, असा आरोप राजू शेट्टी यांनी केला.