पुणे : बीडच्या धर्तीवर राज्यात पीक विमा योजना राबविण्याची तयारी असून केंद्र सरकारची परवानगी मिळाली की त्याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकारांना सांगितली. पुणे विभागाची खरीप हंगामाची पूर्वतयारी बैठक झाली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते .
ते म्हणाले, याबाबत केंद्र सरकारकडे प्रयत्न सुरू आहेत. केंद्राने नकार दिला नाही पण होकारही दिला नाही. याखेरीज केंद्र सरकारच्या अन्य योजनांबाबत प्रयत्न सुरू असून परवानगी मिळताच त्याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. यांचा फायदा हा शेतकरी वर्गाला मोठ्या प्रमाणावर मिळणार आहे. राज्यातील विभागनिहाय खरीप आढावा बैठका पूर्ण झाल्या असून येत्या दोन-तीन दिवसांत राज्य स्तरावरील बैठक होणार असून त्यामध्ये आढावा घेतला जाणार आहे. मुख्यमंत्री ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होईल असे ते म्हणाले.
गेल्या काही दिवसांत राज्यात उकाडा मोठ्या प्रमाणावर वाढल्यामुळे विजेच्या मागणीत मोठी वाढ झाली असे नमूद करून ते म्हणाले, रोजची २५ हजार मेगावॅट मागणी होती ती आता थोडी कमी झाली आहे. यंदा पावसाळा चांगला आहे असे हवामान खात्याने स्पष्ट केले आहे त्यामुळे वीज मागणी आणखी कमी होईल. पण राज्यात भारनियमन करावे लागणार नाही. राज्यात खताचे, बियाणांचे नियोजन करण्यात आले असून ते कमी पडणार नाही असे त्यांनी सांगितले.