नांदेड : राज्यात राजकीय उलथापालथ मोठ्या प्रमाणात होत असून या अनुषंगाने आज दुपारी शिवसेनेचे पदाधिकारी मारावार, पाटील व पावडे यांनी पत्रकार परिषद घेतल्यानंतर तत्काळ आ. बालाजी कल्याणकर यांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढून त्यांच्या कार्यालयावर दगडफेक करण्याचा प्रयत्न केला, परंतु पोलिसांनी मध्यस्थी केल्यानंतर शिवसेना कार्यकर्ते व पोलिसांमध्ये धुमश्चक्री झाली.
संपूर्ण राज्यात बंडखोर आमदारांसंदर्भात राळ उठली असून पुणे, मुंबई, अकोला आदी ठिकाणी आमदारांची कार्यालये फोडून त्यांच्या बॅनरवर काळे फासण्याचे प्रकार घडले. तसाच काही प्रकार आज नांदेड उत्तर भागात घडला. शिवसेनेचे आ.बालाजी कल्याणकर यांच्या मालेगाव रोडवरील संपर्क कार्यालयावर पूर्वीपासूनच कडक पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता. तरीदेखील संतप्त पदाधिकारी व शिवसैनिकांनी त्यांच्या कार्यालयावर जाऊन धुडगूस घालण्याचा प्रयत्न केला. यावेळी कर्तव्यावर असलेल्या पोलिस अधिका-यांनी त्यांना पिटाळून लावण्याचा प्रयत्न केला. तरीदेखील ब-याचवेळ त्यांच्यामध्ये झटापट झाली. अखेर कार्यालय बंद केल्यानंतर शिवसैनिकांनी माघार घेतली. पोलिस अधिकारी सतर्क असल्यामुळे अनर्थ टळला.