पुणे : पुण्यातल्या भोरमधील रामबाग येथे फिल्म शूटिंगचे सामान असलेल्या गोडाऊनला आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीत संपूर्ण गोडाऊन जळून खाक झाले आहे.
सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र या आगीत जवळ जवळ ११ लाखांचे नुकसान झाले आहे. आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. मात्र शॉर्टसर्किटमुळे ही आग भडकली असण्याची शक्यता आहे.
अग्निशामक दलाचे जवान आणि सह्याद्री रेस्क्यू टीम यांच्या ३ तासांच्या अथक प्रयत्नांनंतर ही आग आटोक्यात आली. गोडाऊनमध्ये शूटिंगसाठी वापरले जाणारे कपडे, दागिने, टेबल, खुर्चीसह शूटिंगच्या सेटसाठी वापरले जाणारे साहित्य ठेवण्यात आले होते. आगीत हे संपूर्ण साहित्य जळून खाक झाले आहे.