22.5 C
Latur
Saturday, November 26, 2022
Homeमहाराष्ट्रफटाक्यांच्या आतिषबाजीत राज्यात अनेक ठिकाणी आग

फटाक्यांच्या आतिषबाजीत राज्यात अनेक ठिकाणी आग

एकमत ऑनलाईन

अनेकजण भाजले, दिवाळीच्या आनंदावर विरजण

पुणे/औरंगाबाद : दिवाळी म्हटले की आनंदाला पारावार राहात नाही. पहाटे अभ्यंगस्ना करून फराळाच्या विविध पदार्थांवर ताव मारत फटाक्यांची आतिषबाजी करण्यात तरुणाई गर्क राहते. यंदा दिवाळी निर्बंधमुक्त असल्याने राज्यात सर्वत्र फटाक्यांची धूम सुरू आहे. मात्र, मागच्या दोन दिवसांत फटाके फोडताना अनेक ठिकाणी आगीच्या घटना घडल्या. त्यामुळे मुलांचे हात, चेहरा, डोळ््याला इजा झाल्याचे समोर आले आहे. पुण्यात १७ ठिकाणी आगीच्या घटना घडल्या. त्यामुळे अनेकजण जखमी झाले, तर औरंगाबादेत १६ मुले जखमी झाले असून, ६ जणांवर घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

यंदा निर्बंधमुक्त दिवाळी साजरी करण्यात येत असल्याने सर्वच ठिकाणी दिवाळीचा उत्साह पाहायला मिळत आहे. काल लक्ष्मीपूजनादिवशी राज्यात सर्वत्र फटाके फोडण्याचा मनसोक्त आनंद लुटला. पुण्यात तर सर्वत्र उत्साहाचे वातावरण होते. लक्ष्मीपूजनादिवशी पुण्यात फटाक्यांच्या आतिषबाजीदरम्यान १७ ठिकाणी आगीच्या घटना घडल्या, तर न-हे भागात एक मुलगा जखमी झाला. तसेच अनेकजण किरकोळ जखमी झाले आहेत.

यासोबतच औरंगाबाद शहरांतही आग आणि भाजण्याच्या घटना मोठ्या प्रमाणात घडल्या आहेत. लक्ष्मी पूजनादिवशी शहरांत १६ मुले जखमी झाले आहेत. फटाके फोडताना अनेक मुलांच्या चेहरा आणि डोळ््यांंना इजा झाली आहे. यापैकी ६ मुलांवर घाटी रुग्णालयात उपचार करण्यात आले आहेत. त्यामुळे फटाके जपून फोडण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

प्रदूषणही वाढले
दिवाळीनिमित्त राज्यात सर्वत्र मोठ्या प्रमाणात फटाके फोडले जात आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी धुराचा लोट पाहायला मिळाला. यातून हवेची गुणवत्ता ढासळल्याने वायू प्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. हवेची ढासळलेली गुणवत्ता लहान मुले, हृदयरुग्ण आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी धोकादायक असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या