सातारा : काही तासांपूर्वीच नाशिक शहरात भरदिवसा गोळीबाराची घटना घडली होती. ही घटना ताजी असतानाच आता सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात गोळीबार झाला आहे. यात दोनजण जागीच ठार झाले असून एकजण गंभीर जखमी झाला आहे. पैशाच्या वादातून ही घटना घडली असल्याची प्राथमिक माहिती आहे. आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून तो माजी नगरसेवक असल्याचे सांगितले जात आहे.
सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात गुरेघर धरण परिसरात माजी नगरसेवकाने गोळीबार केला. यात दोनजण ठार झाले असून एकजण गंभीर जखमी झाला आहे. मदन कदम असे आरोपीचे नाव असून त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ठाणे शहरातील माजी नगरसेवक म्हणून मदन कदम यांची ओळख आहे. पवनचक्कीमधील पैशांच्या हिशोबावरुन वाद झाल्याने गोळीबार केल्याचा प्राथमिक अंदाज आहे. पाटण तालुक्यातील मोरणा विभागात घटना घडली. गोळीबार झाल्याने पाटण तालुक्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.