पुणे : एकनाथ शिंदे यांच्या गटातील आमदार उदय सामंत यांच्या गाडीवर पुण्यात मंगळवारी कात्रज परिसरात हा हल्ला झाला होता. या हल्लाप्रकरणात पोलिसांनी कारवाई करत शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या ‘शिवसंवाद’ सभेच्या आयोजकांसह पाच जणांना अटक करण्यात आली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबत उदय सामंत हे देखील दगडुशेठच्या दिशेने जात होते. त्यावेळी ठाकरे समर्थकांनी त्यांच्या गाडीवर हल्ला केला. गद्दार-गद्दार असे म्हणत शिवसैनिकांकडून उदय सामंत यांच्या ताफ्यावर हल्ला करण्यात आला.
या हल्ल्यात गाडीतील एक व्यक्ती जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. याप्रकरणी शिवसेनाप्रमुख संजय मोरेंसह चारजणांना अटक करण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच हिंगोलीमधील जिल्हाप्रमुख बबन थोरात यांच्यावरही या हल्लाप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याचीही माहिती मिळाली आहे.
सामंतांनी आमचे ऐकले नाही : पुणे पोलिस
मुख्यमंत्री शिंदेंच्या ताफ्यासाठी रूट ठरवून दिला होता. मात्र, उदय सामंतांनी तो रूट फॉलो केला नाही. पोलिसांनी ठरवून दिलेल्या रूटने उदय सामंत गेले नाहीत. सामंतांनी आमचे ऐकले असते तर ही घटना टळली असती अशी माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक जगन्नाथ कळसकर यांनी दिली.